अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राचा निषेध करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाटो-पणजी येथे ईडीच्या कार्यालयासमोर काल निदर्शने केली.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने ईडीच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. भाजप सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन हे पाऊल उचलल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप व इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत.

