सर्वोच्च न्यायालयात जाणार ः शिरोडकर
कर्नाटकाने कळसा भांडुरा पाणी प्रकल्पाच्या संयुक्त पाहणीच्या गोवा सरकारच्या मागणीला म्हादई प्रवाहच्या बैठकीत विरोध केल्याने आता संयुक्त पाहणी प्रश्नी आता केंद्रीय परिषदेकडे अर्ज केला जाणार आहे किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली. बंगळूर येथे मंगळवारी झालेल्या चौथ्या म्हादई प्रवाह बैठकीत कर्नाटकने कळसा-भांडुरा पाणी वळवण्याच्या प्रकल्पाच्या संयुक्त तपासणीच्या गोव्याच्या मागणीला विरोध केला. कळसा भांडुरा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा कर्नाटकाने केला आहे. म्हादई प्रवाहकडे गोवा सरकारने दुसऱ्यांदा कळसा भांडुरा संयुक्त पाहणीचा प्रस्ताव सादर केला होता. कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कळसा-भांडुरा येथे बेकायदा कृती केल्याने संयुक्त पाहणीसाठी विरोध करीत आहे. राज्य आता कळसा भांडुरा तपासणीसाठी परिषदेकडे अर्ज करणार आहे. गोव्याने विर्डी धरण प्रकल्पाच्या महाराष्ट्राच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

