>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा गंभीर आरोप
कळंगुट व बागा किनारपट्टीवरील वाढत्या गुन्हेगारीसंबंधी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या पाठोपाठ आता पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही चिंता व्यक्त करताना दिसू लागलेले असून, खंवटे यांनी सदर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला स्थानिक पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
कळंगुट व बागा किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना फसवणाऱ्या दलालांकडे स्थानिक पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खंवटे यांनी केला. परिणामी या किनारपट्टीवरील बेकायदेशीर कृत्यांत वाढच होऊ लागली असल्याचे खंवटे यांनी म्हटले आहे. संध्याकाळी 7 नंतर तर घराबाहेर पडण्यास महिलांना भीती वाटत असल्याचेही खंवटे यांनी नमूद केले.
कळंगुट-बागा परिसरातील दलालांनी तेथे मांडलेल्या उच्छादामुळे या परिसरात पर्यटनाला चालना देण्याच्या कामात अडचणी येऊ लागल्या आहेत. पर्यटन खात्याकडे पोलीस नाहीत. त्यामुळे कारवाई ही पोलीस खात्याला करावी लागणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. आपण याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.