कळंगुट येथे भीषण अपघात; पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

0
5

कळंगुट परिसरात शनिवारी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल केतन गावडे (29, रा. कुंभारजुवे) यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
केतन गावडे हे आपली रात्रपाळीची ड्युटी पूर्ण करून शनिवारी सकाळी दुचाकीवरून घरी परतत होते. सावतांवाडा-कळंगुट मार्गावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की गावडे हे रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले होते. मात्र गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद कळंगुट पोलिस स्थानकात करण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
केतन गावडे हे कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचे आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात
होते.