कळंगुटमधील बेकायदा व्यवसायांकडे सरकारकडून डोळेझाक : आ. लोबो

0
132
आमदार मायकल लोबो यांना लिंबूरस देताना आमदार रोहन खंवटे. (छाया : प्रणव फोटो)

सरकारला घरचा अहेर : कायदा हातात घेण्याचा इशारा
कळंगुट मतदारसंघात चाललेल्या वेश्या व्यवसायासारख्या अन्य अनेक बेकायदा कृत्यांना पोलीस जबाबदार असून सरकारने या प्रकारांकडे डोळे झाक चालविली असल्याचा जाहीर आरोप करून सत्ताधारी भाजप आमदार मायकल लोबो यांनी काल पार्सेकर सरकारला घरचा अहेर दिला. सध्या चाललेले हे बेकायदा धंदे त्वरित बंद न झाल्यास ते आपण बंद करीन. त्यासाठी आपल्याला तुरुंगात जावे लागले तरी चालेल, असा इशाराही लोबो यांनी दिला.कळंगुटमध्ये राज्याबाहेरील व्यवसायिकांनी वेश्या व्यवसाय डान्स बार ड्रग्स असे अनैतिक धंदे चालू केले आणि कळंगुटमध्ये धुडगूस चालू केला. त्यांच्या निषेधार्थ काल सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मायकल लोबो हे उपोषणाला बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे, ऍड्. आयरिश रॉड्रिग्स तसेच कळंगुट मतदारसंघाबरोबरच गोव्यातील वेगवेगळ्या भागातील सुमारे ५०० ते ६०० लोकांनी उपस्थिती लावली.
मायकल लोबो म्हणाले की कळंगुटमध्ये अनैतिक धंदे चालतात त्याची कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिली होती. त्यांनी कळंगुटमध्ये येऊन पाहणी केली आणि डान्सबार, वेश्या व्यवसाय, ड्रग्स हे बंद करण्याचे आश्‍वासन दिले. पण तीन वर्षे झाली तरी त्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. कळंगुट पोलीस आणि गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना याची माहिती दिली आणि हे व्यवसाय बंद करण्यास सांगितले. ते करतो असे सांगून त्या व्यवसायिकांकडून हप्ते घेऊन तात्पुरती कारवाई करून त्यांना पुन्हा हे धंदे चालविण्यास प्रोत्साहन देतात, असा आरोप त्यांनी केला.
सरकार डान्स बार का बंद करू शकत नाही?
स्थानिक पंचायतीने या डान्स बार आणि मसाज पार्लरना जे परवाने दिले ते रद्द करण्याची मागणी केल्यास पंचायत म्हणते ते परवाने रद्द करण्याचे काम आमदारांचे. पंचायतीने दिलेले परवाने रद्द करण्याचे काम आपले नव्हे. मुंबई सारख्या ठिकाणी असलेले ३ हजार डान्स बार तात्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे मंत्री करू शकतात, तर गोवा सरकार कळंगुटमधील फक्त ७ डान्स बार का बंद करू शकत नाही असा प्रश्‍न लोबो यांनी उपस्थित केला. कळंगुट पोलिसांनी येथील जॉन फर्नांडिस या युवकाला विनाकारण मारहाण केली. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आपण मुख्यमंत्री, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांना नोकरीतून निलंबित करावे असेही म्हटल्याचे आमदार लोबों यांनी सांगितले.
यावेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे म्हणाले की सरकारात राहूनही आमदार लोबो यांनी उपोषण करावे लागत आहे. गेल्या २०१३ मध्ये एका नायजेरियनचा पर्रात खून झाला. पर्वरी हरमरस्त्यावर ग्रामस्थ व नायजेरियन यांचा राडा झाला. त्यावेळी पोलीस हातात बांगड्या घालून बसले होते. त्यावेळी पर्वरीच्या लोकांनी संघर्ष केला. गोव्यातील लोकांनी एकत्र येऊन असल्या धंद्याना विरोध केला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी आयरिश रॉड्रिग्स, प्रशांत नाईक, जॉन डिसौझा, ऍलेरिआरिया, मोहन पालयेकर, विलनयोगो लोबो, म्युहिली फर्नांडिस, जुनीन डिले, क्रुझ कार्दोज, बाप्पा, जो आंतोन, ऑलस्टर, आना लोबो, जॉनी सिल्वेरा, अँथोनी डिसोझा, गीता परब, नीला, शॉन मार्टीन यांचीही भाषणे झाली.