कल्याणकारी संस्कृतिदर्शन

0
12

योगसाधना- ५६९, अंतरंगयोग- १५४

  • डॉ. सीताकांत घाणेकर

अनेक नद्यांची घाण, प्रदूषित पाणी सागराच्या पाण्यात मिसळले तरी त्याचे पाणी स्वच्छच असते. सर्व घाण त्याच्या तळाशी जमा होते. तसाच गुण माणसामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये असायला हवा. विश्‍वाच्या संपर्कात आल्यामुळे जी विकार-वासनांची घाण असते ती प्रभुचरणांकडे म्हणजे परमात्माकडे नेऊन त्याची राख करायला हवी.

भारतीय संस्कृती प्रत्येक पैलूमध्ये ज्ञानपूर्ण आहे, तशीच ती भावभक्तीने ओथंबलेली आहे. सूक्ष्म अभ्यास केला, थोडे चिंतन केले की लगेच जाणवते- या संस्कृतीत उच्चकोटीचे तत्त्वज्ञान आहे. जीव- जगत्- जगदीश यांच्यामधील जवळचे नाते कसे व कोणते आहे या मुद्याची येथे परिपूर्ण माहितीच नव्हे तर ज्ञान आहे!
तत्त्वज्ञान हा विषय कोरडा आहे. आवड व भाव नसताना अभ्यास केला तर कंटाळा येतो. काहींना तर ती डोकेदुखी वाटते, कठीण वाटते. आता तत्त्ववेत्त व तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी त्यात गुंतून जातात ही गोष्ट वेगळी. पण ज्या संस्कृतीमध्ये मानवकल्याण व जीवनविकास आहे ती सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या ऋषिमहर्षींनी चिंतन केले व विविध सण, अनेक देव-देवता, त्यांचे उत्पत्तीकार्य, शुभ याबद्दल ज्ञान निर्माण केले. त्यांच्याबद्दल छोट्या-सोप्या गोष्टी, कथा सांगितल्या. त्यामुळे लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत… असे समाजातील सर्व क्षेत्रांतील मानव येथे आकर्षित झाले.
योगसाधनेमध्ये आपला हाच विचार व अभ्यास चालू आहे. हल्लीच श्रीगणेश चतुर्थी सर्वांनी आनंदाने अन् उमेदीने साजरी केली. त्या गणेशाबद्दल आपण बघत आहोत. गणपतीच्या विविध गोष्टींबद्दल विचार चालू आहे.

आता त्याच्या अवयवांबद्दल बघू… या गणपतीचे चार हात व त्यांमधील वेगवेगळ्या वस्तू- एका हातात अंकुश, दुसर्‍या हातात पाश, तिसर्‍या हातात मोदक व चौथ्या हाताने आशीर्वाद देणारा.
अंकुश ः मानवाच्या अनेक विकार-वासनांवर संयम हवा हे सुचवतो. आत्म्याचे मूळ गुण आहेत- पवित्रता, ज्ञान, सत्य, शांती, सुख, आनंद. पण या विश्‍वात जन्म घेतल्यानंतर गर्भावस्थेपासून सुरुवात होऊन जीवनभर विविध विकारवासनांचा मानवी मनावर परिणाम होतो. उदा. षड्‌रिपू- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार. त्याशिवाय द्वेष, सूडभावना… अशा अनेक नकारात्मक गोष्टींना हा पवित्र असलेला मानव बळी पडतो. अशावेळी ही बुद्धीची देवता त्याला संयम पाळायला शिकवते. जसा मत्त हत्तीवर माहुत अंकुश वापरून त्याला नरम करतो.

पाश ः सैरभैर होणार्‍या व झालेल्या इंद्रियांना तसेच अप्रामाणिक व दुष्ट अनुयायांसाठी मी पाश वापरू शकतो हे दर्शवितो. खरे म्हणजे प्रत्येक विद्वान तत्त्ववेत्ता व नेता यांच्याकडे हे सामर्थ्य असणे अत्यावश्यक आहे, नाहीतर जीवनात व समाजात अंधाधुंदी माजेल.
आजच्या विश्‍वात हेच दृश्य जास्त दिसते. त्यामुळे जग विनाशाच्या वाटेवर आहे.
मोदक ः जो मोद देतो तो मोदक, म्हणजे आनंद मिळतो- संतोष होतो. मोदक एक अत्यंत सात्त्विक व पौष्टिक आहार आहे. भगवंताला अशा वस्तूचा आपण नैवेद्य दाखवतो. आपणही यापासून बोध घ्यायला हवा. नेत्याचा, तत्त्ववेत्त्याचा आहार सात्त्विक हवा, कारण तेच समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांना बघून समाजातील सामान्य व्यक्ती वागतात, त्यांचे अनुकरण करतात.
पूजनीय पांडुरंगशास्त्री मोदकाचा छान तात्त्विक अर्थ समजावतात. ते म्हणतात की, मोदकाच्या बाहेरच्या पापुद्य्राप्रमाणे तत्त्वज्ञानदेखील वरवर व बाहेरून चाखणार्‍यांना चवहीन वाटते. परंतु आतील भाग मधुर असतो.

तत्त्वज्ञान हा विषयसुद्धा सुरुवातीला निरस, कठीण वाटतो; पण नियमित भावपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्या विषयात गोडवा निर्माण होतो व खोलवर जाण्याची इच्छा होते. त्यामुळे सूक्ष्म दृष्टिकोण विकसित होतो. अशा विद्वानांना पी.एचडी.ची डिग्री प्राप्त होते.
बालपणात आम्हाला सुरुवातीला जेव्हा मोदक दिला त्यावेळी वरचा शेंडा- जो जरा घट्ट असतो- त्याला चव नसते. तो आवडत नाही. कारण त्याच्यात फक्त पीठच असते. पण आतील गोड भाग जेव्हा खाल्ला तेव्हा मोदक किती गोड आहे याची जाणीव झाली. कारण त्याच्यात गूळ घातलेली पंचखाद्य होते.
चौथा हात आशीर्वादाचा ः शास्त्रीजी सुचवतात की जेव्हा आपल्या स्वतःच्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात, त्याला प्रभू आशीर्वाद देतात. किंवा स्वतःच्या लाडक्या मुलांना भरविण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवला आहे व दुसर्‍या हाताने तो त्यांना बोलावीत आहे.

गणपतीला लंबोदर म्हणतात ः मोठ्या उदराचं हे प्रतीक आहे. ऐकलेल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्या पोटात साठवाव्यात हे येथे सूचित करते. तत्त्ववेत्ते तसेच नेते या दोघांना या गुणाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण त्यांच्याजवळ त्यांचे लहान-मोठे, जवळचे-दूरचे अनुयायी अनेक गोष्टी उघड करतात. कारण त्यांची अपेक्षा असते की ते त्या गोष्टी ऐकून त्यांचा गैरफायदा घेणार नाहीत. उलट कळत-नकळत अशा बाबींवर पांघरूण घालून क्षमा करतील. शेवटी प्रत्येक माणूस अशा चुका जीवनात करतोच; पण पश्‍चाताप होऊन माफी मागितली तर त्याला क्षमेची अपेक्षा असते.

तसेच त्या नेत्याने जर अनुयायाला कष्ट दिले तर त्या नेत्यावर कुणीही विश्‍वास ठेवणार नाही. म्हणूनच पूर्वज म्हणतात- ‘माणूस घागरपोटाचा नाही तर सागर पोटाचा असायला हवा.’
सागराचे उदाहरण बघितले तर लक्षात येईल की तो स्वतःच्या पोटात अनंत गोष्टी सामावून घेतो. अनेक नद्यांची घाण, प्रदूषित पाणी जरी त्याच्या पाण्यात मिसळले तरी सागराचे पाणी स्वच्छच असते. सर्व घाण त्याच्या तळाशी जमा होते. म्हणून तर नदी सागराला भेटण्यासाठी आतूर असते.

तसाच गुण माणसामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये असायला हवा. विश्‍वाच्या संपर्कात आल्यामुळे जी विकार-वासनांची घाण असते ती प्रभुचरणाकडे म्हणजे परमात्म्याकडे नेऊन त्याची राख करायला हवी. म्हणूनच तीर्थयात्रेनंतर पापक्षालनाचा एक सुंदर विधी पूर्वकाळी असायचा.
सारांश काय तर या तत्त्ववेत्त्या देवापासून विविध गोष्टींचा योगसाधकाने बोध घेऊन आपला जीवनविकास साधावा.