कलेचे उपासक ः परेश जोशी

0
19
  • गजानन यशवंत देसाई

नाट्यदिग्दर्शनाचे कुठलेही प्रशिक्षण न घेता आपल्या अंगी असलेल्या नैसर्गिक कलागुणांनी परेश सर यशस्वी दिग्दर्शक बनले. काही व्यक्ती कलेकडे एक छंद म्हणून पाहतात, तर काही व्यवसाय म्हणून. परेश सरांनी आपली कला ही केवळ छंद म्हणून जोपासली!

जीवनात नावाला आणि रूपाला जेवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व त्या व्यक्तीच्या गुणांना आणि कर्तृत्वाला आहे असे म्हटले जाते. पण या सर्व गोष्टी एकत्रित आल्या तर? असा हा दैवदुर्लभ योग परेश जोशी सरांच्या बाबतीत घडून आला आहे. या चारही गुणांचा संगम त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो.
एम. ई. एस. उच्च माध्यमिक विद्यालयात मी शिक्षक म्हणून रूजू झालो त्यावेळी जोशी कुटुंबीयांविषयी फक्त ऐकले होते. माजी आमदार वै. वसंतराव जोशी हे मोठे उद्योजक होते. कलेचे उपासक तर ते होतेच, शिवाय आश्रयदातेही होते. त्यांच्या घरी दामोदर सप्ताह भरायचा.
मी जोशी सरांना पहिल्यांदा 1990 साली पाहिले. त्या वर्षीचा तो माझा पहिला सप्ताह होता. श्री दामोदराच्या दर्शनासाठी मी रांगेत उभा होतो, त्यावेळी माझी नजर एका व्यक्तीकडे गेली. माझीच नव्हे तर कुणाचीही नजर स्वतःकडे खेचून घेण्यासारखे ते व्यक्तिमत्त्व होते. गोरा तांबूस वर्ण, वेधक डोळे, सहा फुट उंची, सदरा-पायजमा आणि डोक्यावर भारतीय टोपी. प्रथमदर्शनी मला वाटले ते गोव्याबाहेरील अभिनेते असावेत. दामोदर उत्सवाप्रीत्यर्थ आले असावेत. पण तो माझा समज चार दिवसातच गळून पडला. दुचाकी घेण्यासाठी ज्यावेळी ‘बजाज’च्या शोरूममध्ये आलो त्यावेळी हे व्यक्तिमत्त्व तिथे होते आणि चक्क कोकणीत बोलत होते.
परेश सर एक उत्कृष्ट नाट्य-दिग्दर्शक. ‘अमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या संस्थेद्वारे ते नाट्यदिग्दर्शनाने नाट्यक्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत. नाट्यदिग्दर्शनाचे कुठलेही प्रशिक्षण न घेता आपल्या अंगी असलेल्या नैसर्गिक कलागुणांनी ते यशस्वी दिग्दर्शक बनले.
काही व्यक्ती कलेकडे एक छंद म्हणून पाहतात, तर काही व्यवसाय म्हणून. परेश सरांनी आपली कला ही केवळ छंद म्हणून जोपासली. नपेक्षा मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक म्हणून गोवा आणि महाराष्ट्रभर ते निश्चितच नावाजले असते.

लहानपणापासून सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत असताना फक्त नाट्यवेडापायी ते सामान्यांशी मिळून-मिसळून वागायचे. घरात पूर्वापार चालून आलेला व्यवसाय होता. गोवा मुक्त होण्याअगोदर त्यांच्याजवळ ‘बेडफोर्ड’ कंपनीची डिलरशीप होती. गोवा मुक्तीनंतर ‘बजाज’ची डिलरशीप. लक्ष्मी घरी पाणी भरीत असतानाच घरात कलेच्या संवर्धनाच्याही गोष्टी व्हायच्या. त्यांच्या घरी देशातील नामवंत कलाकारांची उठबस असायची. पण हे रसायनच वेगळे होते. अहंकाराचा स्पर्शही त्यांच्या मनाला नव्हता. कितीतरी नाट्यकलाकारांना त्यांनी रंगमंच उपलब्ध करून दिला. कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेत त्यांनी आपल्या संस्थेतर्फे ‘बिऱ्हाड वाजलं’, ‘एवंम्‌‍ पराजित’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘पती गेले ग काठेवाडी’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘पडघम’ अशी कितीतरी नाटके आपल्या दिग्दर्शनाखाली स्पर्धेत उतरवली आणि गोमंतकाच्या नाट्यपरंपरेला चालना दिली. एक व्यावसायिक म्हणून ते कडक शिस्तीचे होते, आणि त्यांची ती शिस्तबद्धता नाटकाच्या तालमीतही दिसून यायची. आजही गोमंतकातील नाट्यदिग्दर्शकांच्या यादीत परेश सरांचे नाव ठळकपणे अधोरेखित होते.
त्यांच्या या कामगिरीची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली. राणे सरकारच्या काळात त्यांच्यावर गोवा कला अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली गेली. दरम्यानच्या काळात अतिशय भरीव अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली होती. कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून त्यावेळी माननीय श्री. प्रतापसिंह राणे तर सदस्य सचिव म्हणून श्री. विनायक खेडेकर पदभार सांभाळत होते.

परेश सरांचे प्राथमिक शिक्षण वास्को येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण त्यांनी बेळगाव येथे जाऊन घेतले. पदवीचे शिक्षण पुणे येथे करून नंतर ते पदव्युत्तर शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. एक राजकारणी म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 1970 साली त्यांनी वास्कोचे नगराध्यक्ष म्हणून काम केले. पुण्याला शिक्षणाच्या निमित्ताने गेले असता त्यांची मैत्री पूर्वाश्रमीच्या ललिता देशपांडे यांच्याशी होऊन त्याचे रूपांतर लग्नात झाले. ललिता जोशी त्यांना समर्थपणे साथ देत आल्या आहेत.

परेश सर आज मुरगाव एज्युकेशन संस्थेचा कारभार पाहत आहेत. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी त्यांचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. परंतु वेळ पडल्यास कडक शिस्तीचेही पालन करायला मागेपुढे पाहत नाहीत. साताठ वर्षांपूर्वी काही काळ शिक्षक प्रतिनिधी (टिचर रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून मी मुळगाव शिक्षण संस्थेवर नियुक्त होतो. एका बैठकीच्या वेळी माझे काही मुद्दे मी मांडले होते. मनात भीती होती, परेश सरांना वाईट वाटलो तर? पण बैठक संपल्यावर परेश सर उठले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले ‘चला देसाई, आपण संस्थेच्या नव्या इमारतीचे चाललेले काम पाहू. इट इज युअर प्रिव्हिलेज.’ आणि क्षणात माझ्यावर असलेला ताण कुठल्या कुठे निघून गेला.
परेश सर आता 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर भारीव असे कार्य घडो ही ईशचरणी प्रार्थना!