Home बातम्या कला अकादमीला नवी दिशा

कला अकादमीला नवी दिशा

0

गोवा कला अकादमीच्या अध्यक्षपदी विष्णू सूर्या वाघ यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकार – साहित्यिकाची योग्य निवड झाली आहे. पदाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी या संस्थेच्या अभिवृद्धीसाठी अनेक संकल्प जाहीर केले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे यापुढे कला अकादमीमध्ये कलाकारांना पाहुण्यांसारखी वागणूक दिली जाणार नाही, तर घरच्यासारखी वागणूक मिळेल, असे ते म्हणाले. कला अकादमीमध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा झाला, तर त्यासाठी कर्मचार्‍यांपासून सुरक्षारक्षकांपर्यंत या कलाकारांना आपुलकीचे सहकार्य आजवर कधीही मिळाले नाही. त्यांचे संबंध केवळ व्यावहारिक राहिले, कधी त्यात जिव्हाळा दिसला नाही. कुठल्याही संस्थेमध्ये शिस्त आवश्यक असतेच, परंतु त्याचबरोबर एक आपुलकीचे वातावरणही हवे असते. या संस्थेवर कायम एक ‘सरकारी’ छाप राहिली आहे. कला अकादमीच्या कार्यालयामध्ये कितीही मोठा कलाकार जरी गेला, तरी त्याला तेथे जी परकेपणाची वागणूक मिळते, तसे होऊ नये.

जनसंपर्काला, माणसे जोडण्याला अकादमीने महत्त्व द्यायला हवे. गोमंतक मराठी अकादमीच्या अध्यक्षपदी शशिकांत नार्वेकर असताना ते जसे सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचे एक जितेजागते केंद्र बनले होते, तशी चहलपहल कला अकादमीत असायला हवी. संस्थेवरील सरकारी छाप पूर्णपणे मिटवून ते समस्त गोमंतकीय कलाकारांचे हक्काचे माहेरघर बनवण्याची जबाबदारी वाघ यांच्यावर आहे आणि ती ते निश्‍चित पेलतील. कला अकादमीचा वापर हिर्‍यांच्या प्रदर्शनासारख्या कलाबाह्य विषयांसाठी यापुढे होणार नाही असा दिलासा त्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला आहे. आजवर महसुलाचे कारण पुढे करून कला अकादमीचा जो बाजार मांडला गेला होता, त्याला आळा बसलाच पाहिजे अशी समस्त कलाप्रेमी जनतेची मागणी होती. सरकारचे पाठबळ अकादमीला असेल अशी ग्वाही मुुख्यमंंत्र्यांनी दिलेली आहे, त्यामुळे निधीची तोशीस अकादमीला पडणार नाहीच, परंतु आर्थिक बाबतींत स्वयंपूर्ण व्हायचे झाले तरी त्यासाठी अनेक योग्य मार्ग हाताळता येण्यासारखे आहेत. अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाचा वापर जो आजवर केवळ काही तासांसाठी होत आला, त्यावर उघडझाप करता येणारे घुमटाकृती छत उभारून उन्हा – पावसातही तेथे कार्यक्रम आयोजित करता आले, तर त्यापासून अतिरिक्त महसुल तर मिळेलच, परंतु नाट्यगृह न मिळण्याची आजवरची अडचणही दूर होईल. कला अकादमीबाबतची आजवरची एक तक्रार म्हणजे तेथे केवळ महिनोन् महिने तियात्रांचे व्यावसायिक खेळ चालतात, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना दीनानाथ मंगेशकर कलामंंदिर उपलब्ध होऊ शकत नाही. ही समस्या दूर व्हायला हवी. अकादमीतील ब्लॅक बॉक्सची रया पर्रीकर यांच्या मागील मुख्यमंत्रिपदाच्या काळातच घालवली गेली. ते ब्लॅक बॉक्स पूर्वीच्या शानदार स्थितीत आणण्याची वाघ यांची घोषणा कौतुकास्पद आहे. ते जुने ब्लॅक बॉक्स ही कला अकादमीची एक शान होती. भारतीय बैठकीवरच तेथील कार्यक्रम व्हायला हवेत. अकादमीशी संबंधित विविध वर्ग, अभ्यासक्रम यांची फेररचना करून अधिकाधिक मुलांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवावा. येत्या उन्हाळी सुटीमध्ये ‘समर कॅम्प’चे आयोजन करून मुलांच्या कलागुणांना पैलू पाडण्याचा उपक्रम ‘बालभवन’प्रमाणेच कला अकादमीलाही करता येईल. दर आठवड्याला एखाद्या मान्यवराला बोलावून त्याच्याशी अकादमीच्या हिरवळीवर उपस्थितांच्या मुक्त वार्तालापाचा ‘कॉफी क्लब’ सारखा उपक्रम कला अकादमीने अवश्य करावा. मांडवी किनार्‍याच्या बाजूची थोडी फेररचना करून मनमोहक निसर्गाच्या साथीने तेथे साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम करता येण्यासारखे आहेत. अकादमीचे कार्य केवळ पणजीपुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण भागांमध्ये अधिक विस्तारण्याचा संकल्पही वाघ यांनी बोलून दाखवलेला आहे. गोव्याच्या मातीत संगीत आहे, प्रतिभा आहे. अकादमी ही केवळ एक भाडोत्री ‘थिएटर’ नव्हे. गावोगावचे नवांकुर जोपासून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, गोव्याच्या कला व संस्कृतीचे जतन करणे, हे अकादमीचे प्रधान कर्तव्य आहे आणि ते जपण्याच्या दिशेनेच वाघ यांची पावले पडतील असा विश्वास गोमंतकीयांना आहे.