>> नाट्यप्रयोगावेळी प्रकाशयोजनेतील बिघाडानंतर कला अकादमी पुन्हा चर्चेत
कला अकादमीमध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘पुरुष’ नाटक सुरू असताना रविवारी सदोष प्रकाशयोजनेमुळे कला अकादमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, कला अकादमीतील या सदोष प्रकाशयोजनेच्या विषयावर भाष्य करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट नकार दिला.
सुमारे 70 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेली कला अकादमी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कला अकादमी नूतनीकरण प्रश्नी कृती दलाची स्थापना केली असून, काही महत्त्वाची शिफारशी व त्रुटी देखील दाखवून देण्यात आलेल्या आहेत.
शरद पोंक्षे यांच्या पुरुष या नाटकाचा प्रयोग रविवारी कला अकादमीच्या मुख्य रंगमंचावर आयोजित करण्यात आला होता. हा प्रयोग सुरू असताना प्रकाशयोजनेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 10 मिनिटांसाठी नाटकाचा प्रयोग बंद ठेवावा लागला. या प्रकाराबद्दल नाट्य रसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या विषयावरून नाट्य कलाकार आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. देश आणि जागतिक पातळीवर पर्यटनातील गैरप्रकारांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. आता, देशपातळीवर कला अकादमीच्या विषयावरून गोव्याचे नाव बदनाम होण्यास सुरुवात झाली आहे. परराज्यातून येणाऱ्या कलाकारांना कला अकादमीत कटू अनुभवांना तोंड द्यावे लागत आहेत, अशी टीका आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी केली.
सरकारने नियुक्त केलेल्या कृती दल समितीच्या बैठकीत प्रकाशयोजना, ध्वनी व इतर विषयावर चर्चा झाली आहे. ध्वनी, प्रकाशयोजना योग्य प्रकारे नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तथापि, कला अकादमीमध्ये काहीच समस्या नाही, असा दावा कला-संस्कृती खात्याच्या मंत्र्याकडून केला जात आहे, अशी प्रतिक्रिया नाट्यकर्मी देविदास आमोणकर यांनी व्यक्त केली. यापूर्वी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेवेळी बाहेरून प्रकाशयोजना आणून प्रकाशयोजनेत काहीच त्रुटी नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला होता, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कला अकादमीच्या ध्वनी आणि प्रकाशयोजनेमध्ये त्रुटी असताना त्याची जबाबदारी कला-संस्कृती मंत्र्याकडून स्वीकारली जात नाही ही वाईट गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षापचे अमित पालेकर यांनी व्यक्त केली.
काल एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कला अकादमीतील सदोष प्रकाशयोजनेच्या मुद्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही.
सविस्तर अहवाल मागवला : सदस्य सचिव
कला अकादमीच्या नाट्यगृहातील प्रकाशयोजनेमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. अहवाल मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सदस्य सचिव अरविंद खुटकर यांनी दिली.
शरद पोंक्षे यांच्याकडून नाराजी व्यक्त
कला अकादमीच्या नाट्यगृहाला व्यवस्थापक नसणे ही दुर्दैवी बाब आहे. आमच्या ‘पुरुष’ नाटकाच्या वेळी प्रकाशयोजनेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रेक्षकांना नाटक योग्य प्रकारे पाहता आले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या नाट्यगृहाची स्थिती सुधारावी, अशी मागणी शरद पोंक्षे यांनी केली.