पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू
गोवा कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये गेल्या रविवार दि. 13 एप्रिल रोजी ‘पुरुष’ नाटकाच्या वेळी घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. नाटक सुरू असताना प्रकाशयोजनेतील बिघाड हा तांत्रिक कारणामुळे झाला. त्यात कोणतीही मानवी चूक नाही. असे स्पष्टीकरण कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अकादमीच्या आवारात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना काल केले.
कला अकादमीच्या मुख्य थिएटरमधील प्रकाश योजनेमध्ये पुढील काळात असा प्रकार घडू नये म्हणून पर्यायी प्रकाश योजनेची व्यवस्था केली जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीच्या थिएटरमध्ये नाटक सुरू असताना प्रकाश योजनेची समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अकादमीच्या सदस्य सचिवांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले होते. सदर चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. प्रकाश योजनेमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने समस्या निर्माण झाली.
नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर प्रकाश योजनेच्या सर्व दिव्यांची तपासणी करण्यात आली. त्यात एक दिव्यामध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळून आल्यानंतर त्वरित बदलण्यात आला. 14 एप्रिल रोजीच्या प्रयोगाच्या प्रकाश योजनेची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. प्रकाश योजनेमधील त्रुटीची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
एलईडी बल्बमध्ये दोष
कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर मुख्य थिएटरमध्ये एलईडी पद्धतीची प्रकाश योजना करण्यात आली आहे. या एलईडी पद्धतीच्या प्रकाश योजनेमधील बल्ब सर्कीटच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या एलईडी बल्बमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यास पूर्ण प्रकाश योजनेवर परिणाम होतो. प्रकाश योजनेतील या समस्येची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आलेली आहे. याच समस्येमुळे कला अकादमीच्या मुख्य थिएटरमध्ये पर्यायी प्रकाश योजनेची व्यवस्था केली जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
शरद पोंक्षेंकडून दिशाभूल
नाट्यप्रयोगानंतर अभिनेते शरद पोंक्षेनी केलेली काही विधाने दिशाभूल करणारी आहेत. कला अकादमीच्या ध्वनियंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. कला अकादमीचे संबंधित कर्मचारी ‘पुरुष’ नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळी थिएटरमध्ये उपस्थित होते. अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही जणांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून वक्तव्य केले असण्याची शक्यता आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.