नगर नियोजन खात्याच्या वादग्रस्त बनलेल्या कलम 39 अ वर विधानसभेत चर्चा करून राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप गाभा समिती, आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार वीरेश बोरकर यांनी टीसीपी कलम 39 अ च्या विरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी आमदार बोरकर यांची भेट घेऊन आंदोलनावर फेरविचार करण्याची विनंती केली, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
नगरनियोजन खात्याच्या कार्यालयात आंदोलनाच्या वेळी आमदार बोरकर यांच्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तनाची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात पोलीस अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

