एकदा का मनावर स्वार्थ स्वार झाला की तोच सार्या आचार – विचारांवर राज्य करू लागतो. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या खेळाडूंच्या बाबतीत हेच घडले आहे. केवळ पैसा आणि पैसा हेच जीवनध्येय मानलेल्या या खेळाडूंनी पैशासाठी आपल्याला लौकीक प्राप्त करून देणार्या क्रिकेटशी आणि त्याच्या कोट्यवधी चाहत्यांशी प्रतारणा केली. या गुन्ह्याची शिक्षा आता त्यांना भोगावीच लागेल. या फिक्सिंग प्रकरणाची पाळेमुळे दाऊद इब्राहिमच्या टोळीशी आहेत आणि त्यांच्या धमक्यांमुळे हे खेळाडू या प्रकारांत गुंतले गेले असा युक्तिवाद आता काहीजण पुढे करीत असले, तरी हे खेळाडू म्हणजे काही कुकुली बाळे नव्हेत. धमक्या मिळाल्याची वाच्यता त्यांनी केली असती, तर सारा देश त्यांच्या पाठीशी उभा ठाकला असता आणि त्यांच्या नैतिक धैर्याने क्रिकेटची कारकीर्दही उजळून निघाली असती. परंतु जेथे नैतिक पायाच भुसभुशीत असेल तेथे भ्रष्टाचाराची वाळवी घर करणारच! या खेळाडूंनी जे कृत्य केले ते अक्षम्य आहे. उपलब्ध प्रबळ पुरावे लक्षात घेता त्यांची भावी कारकीर्द अंधःकारमय तर झाली आहेच, परंतु क्रिकेट या खेळावर जीव ओवाळून टाकणार्या या देशातील कोट्यवधी नागरिकांवरही जणू विश्वासघाताची वीज पुन्हा एकवार कोसळली आहे. गेली अनेक वर्षे फिक्सिंगच्या घटना पुन्हा पुन्हा व सातत्याने उजेडात येत चालल्या आहेत.
त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अक्राळविक्राळ स्वरूप आपल्या समोर वेळोवेळी आले आहे. महंमद अझरुद्दिन, अजय जडेजापासून हॅन्सी क्रोनिएपर्यंत आणि पाकिस्तानच्या महंमद अमीर, महंमद असीफपर्यंतच्या द्रोहपर्वाचे चटके क्रिकेटरसिकांनी निमूट सोसले. आता आयपीएलच्या रंगरंगिल्या विश्वालाही फिक्सिंगने काळवंडून टाकल्याचे समोर आल्याने या रसिकांनी आशेने पाहायचे तरी कोणाकडे? विश्वास हा काचेसारखा असतो. त्याला एकदा तडा गेला की काही केल्या सांधता येत नाही. भारतीय क्रिकेटरसिकांच्या दृढ विश्वासाला श्रीशांत आणि त्याच्या बहकलेल्या साथीदारांनी असाच जबर तडा दिला आहे, जो आता सांधणे शक्य नाही. श्रीशांतच्या बालिशपणाच्या कहाण्या आजवर प्रसारमाध्यमांनी चवीने चघळल्या, त्याचे कोडकौतुकही केले. पण हरभजनकडून थप्पड खाणार्या या पोराने आज देशावरच थप्पड लगावली आहे. आयपीएलच्या तमाशाविषयी तर काय बोलावे! तमाशालाही प्रतिष्ठा असते. तेथे कलावंत इमानाने राबत असतात. आयपीएलने तर सार्या हद्दी पार केल्या आहेत. एकेकाळी सभ्य माणसांचा खेळ म्हणून आदराने ज्या खेळाचे नाव घेतले जाई त्या क्रिकेटला बाजारूपणाच्या आणि थिल्लरपणाच्या वेशीत आणून कोणी ठेवले असेल तर ते आयपीएलने. त्यामुळे जेव्हा या सामन्यांमध्ये फिक्सिंगच्या बातम्या आल्या, तेव्हा कोणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. येथे एवढे काही घडते आहे, मग हेही घडत असलेच पाहिजे अशीच रसिकांची मानसिकता तयार झाली होती. पण तरीही जेव्हा सत्य उजेडात आले तेव्हा तो धक्का पचवणे क्रिकेटरसिकांना जडच गेले. हे दुःख प्रतारणेचे आहे, विश्वासघाताचे आहे. डी गँगशी जेव्हा या सार्या प्रकरणाचे धागेदोरे जुळतात तेव्हा तर त्याला देशद्रोहाचेच रूप प्राप्त होते. या प्रकरणात अटक झालेल्या एका बुकीने म्हणे पाकिस्तानमधील बुकींशी संपर्क साधण्यासाठी तीस फोन लाइन बसवून घेतल्या होत्या. सट्टेबाजीच्या या खेळात पैसाच नव्हे, तर मुलींचाही वापर झाल्याच्या बातम्या आहेत. हे सारे लाजीरवाणे आहे. खेदजनक आहे. बीसीसीआय या सार्या प्रकारांबाबत किती हतबल आहे हेही या निमित्ताने उजेडात आले. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागावर त्यांची सारी मदार आहे. त्यांच्या तपासाला खूप मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील अशा गैरप्रकारांविरुद्ध कायदा करण्यासाठी तत्परतेने जे पाऊल उचलले आहे, ते आवश्यकच ठरते. असा कठोर कायदा झाला तर थोडी जरब जरूर बसेल, परंतु मुळात खेळाडूंची मानसिकता बदलली पाहिजे. क्रिकेट हा श्वास आणि ध्यास असेल तर पैसा दुय्यम ठरतो! गत इतिहासातील खेळाडूंना पैसा मिळाला नसेल, परंतु त्यांनी क्रिकेटशी इमान राखले. या खेळाने त्यांना नावलौकीक दिला, सन्मान दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जगभरच्या क्रिकेट चाहत्यांचे अपरंपार प्रेम दिले. या सार्याचे मोल पैशांत मोजता येईल काय? मूठभर पैशासाठी क्रिकेटशी, क्रिकेटरसिकांशी आणि देशाशी असलेले इमान विकणार्यांना हे कधी उमगणार!