कर्मचारी निवड आयोगामार्फत नोकरभरतीचे स्वागत ः कॉंग्रेस

0
5

यापुढे राज्यातील सरकारी नोकरभरती ही कर्मचारी निवड आयोगातर्फे करण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जी घोषणा केली आहे त्या घोषणेचे काल विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी स्वागत केले. सरकारने तसे केल्यास भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांपैकी एका वचनाची तरी निदान पूर्ती होईल, असे ते पुढे म्हणाले.
याचवेळी आलेमांव यांनी, भाजपचे मंत्री व आमदार हे नोकर्‍या देत नाहीत तर ते नोकर्‍यांची विक्री करीत असतात, असा आरोप आलेमांव यानी केला.

सरकारने आणखी विलंब न करता नोकरभरती कर्मचारी निवड आयोगातर्फे करण्यासाठी विनाविलंब अधिसूचना काढावी, अशी मागणीही आलेमांव यानी केली. सरकारी नोकरभरतीत झालेल्या घोटाळ्याच्या प्रश्‍नावरुन त्यानी प्रमोद सावंत सरकारवर जोरदार टीका केली.

कॉंग्रेस पक्षाने गोवा व्हिजन २०३५ चा जो रोडमॅप तयार केला होता त्याचा शब्द न शब्द मुख्यमंत्र्यांनी वाचावा. तज्ज्ञ मंडळींची मदत घेऊन हा ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील बेरोजगारीसह सगळे प्रश्‍न सुटू शकतील व गोवा हे एक प्रगतीशील राज्य बनू शकेल, असे आलेमांव म्हणाले.

कर्मचारी निवड आयोगातर्फे नोकरभरती करण्यासाठीच्या अधिसूचनेसाठी जानेवारीपर्यंत थांबण्याची गरज नसल्याचे आलेमांव यांनी सांगितले.
वेर्णा येथे जे १३० कामगार संपावर आहेत त्यांचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी सोडवावा. महाराष्ट्रीयनांच्या फायद्यासाठी गोमंतकीय कामगारांचा बळी देऊ नका, अशी मागणीही आलेमांव यानी काल केली.