विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी असलेला कॉंग्रेस पक्ष यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी आज ५ रोजी मतदान होत आहे.
या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी भाजपने जाहीर केलेला बंगळूरसाठीचा वेगळा जाहीरनामा. २८ आमदार देणार्या बंगळूरसाठी भाजपने या आठवड्यातच वेगळा जाहीरनामा जाहीर केला आहे. भाजपचा प्रमुख जाहीरनामा गेल्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झाला होता.
भाजपने बंगळूरसाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यामागे तेथील मोठ्या संख्येने असलेल्या युवा मतदारांना आकर्षित करणे हे मुख्य कारण मानले जाते. आतापर्यंत भाजपचा बंगळूरमधील ‘नाईट लाईफ’ची वेळ वाढविण्यास विरोध होता. मात्र या जाहीरनाम्यात भाजपने येथील ‘नाईट लाईफ’ वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. बंगळूरमधील मद्यालये, उपाहारगृहे, खाद्य पदार्थांची ठिकाणे यांची रात्री ११.३० ऐवजी १ वा. पर्यंत वेळ वाढवावी अशी मागणी केली जात होती. बंगळूर हे देशातील प्रमुख आयटी हब असल्याने येथे देशभरातील हजारो युवक कामानिमित्त असल्याने ही मागणी केली जात होती. तथापि आतापर्यंत या मागणीस भाजपतर्फे या मागणीला विरोध केला जात होता. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. २२५ सदस्य संख्येच्या कर्नाटक विधानसभेवर बंगळूरमधून २८ आमदार प्रतिनिधीत्व करत असल्याने व २००८ च्या निवडणुकीत येथून भाजपचे १७ उमेदवार निवडून आले असल्याने ती बाब विचारात घेऊन भाजपने आपले धोरण बदलले आहे. या निवडणुकीत भाजपला कॉंग्रेसकडून कडवा प्रतिकार होण्याची शक्यता आहे. त्यातच काही काळापूर्वी भाजपचे मुख्यमंत्री राहिलेले येडीयुरप्पा यांनी दुसरा पक्ष काढला असल्याने भाजपवर परिणाम होण्याची शक्यता आहे.