कर्नाटकातील नवे नाटक

0
60

कर्नाटक भाजपामधील बंडाळीने पुन्हा एकवार उचल खाल्ली आहे. बी. एस. येडीयुराप्पांनी रविवारी कर्नाटक जनता पार्टी नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा भाजपाचे चाळीस – पन्नास आमदार आपल्या साथीला येतील असा दावा त्यांनी केला होता, परंतु आतापावेतो तरी ही संख्या २१ च्या वर गेलेली नाही. तरीदेखील भाजपासाठी हा मोठा हादराच आहे आणि त्यातून पक्षाचे कमीत कमी नुकसान व्हावे या दृष्टीने भावी रणनीती पक्षाला आखावी लागणार आहे. येडीयुराप्पांचे मुख्यमंत्रिपद गेले तेव्हापासून त्यांचा पक्षाला उपद्रव सुरूच होता. मध्यंतरी स्वतःकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद यावे यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाहिले. पण भाजपाचे केंद्रीय नेतृत्व तेव्हा बधले नाही. पक्षाने येडीयुराप्पांच्याच लिंगायत समाजाच्या नेत्याकडे – जगदीश शेट्टर यांच्याकडे त्यांनी सरकारची सूत्रे दिली. परंतु येडीयुराप्पांचा असंतोष काही शमला नाही. तो धुमसत धुमसत शिगेला पोहोचला आणि त्यातून नवा प्रादेशिक पक्ष स्थापनेपर्यंत त्यांची मजल गेली. नुसता पक्ष स्थापन करूनच ते थांबलेले नाहीत, तर कर्नाटक भाजपला मोठे खिंडार पाडण्याची त्यांची मनीषा आहे. मुख्यमंत्री शेट्टर यांना तर त्यांनी उघडउघड आव्हानच दिले.

आपल्या समर्थनार्थ येणार्‍या आमदारांवर कारवाई करूनच दाखवा असे ते म्हणाले. येडीयुराप्पांची ही दंडेली कितपत सहन करून घ्यायची याचा विचार भाजपाने आता ते पक्षाबाहेर पडल्यावर तरी करणे आवश्यक आहे. येत्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि अस्तनीतल्या निखार्‍यांचा सामना करीत पक्षाला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे येडीयुराप्पांच्या पक्षाच्या व्यासपीठावर जाणार्‍या, त्यांच्या चहापानाला हजर राहणार्‍या अस्तनीतल्या निखार्‍यांचे चटके सोसत बसण्यापेक्षा या फुटिरांना पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत आणून सहा वर्षांसाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकता येऊ शकेल का याची चाचपणी पक्षाकडून चालली आहे. विधानसभा बरखास्तीचा विचारही भाजपा गोटात सुरू असल्याच्या वार्ता आहेत, परंतु राज्यपाल भारद्वाज त्यात खोडा घालण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपापुढे मुख्य प्रश्न आहे तो पक्षाची डागाळत चाललेली प्रतिमा सावरण्याचा. येडीयुराप्पांच्या कारकिर्दीत झालेल्या खाण घोटाळ्याने, जमीन घोटाळ्याने आधीच पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यात आताच्या बंडखोरीने जनतेच्या मनातून पक्षाने विश्वासार्हता गमावली तर त्याचे मोठे नुकसान आगामी निवडणुकीत सोसावे लागू शकते. विविध जाती समुदायांना प्रतिनिधित्व देण्याची कसरत भाजपाने आजवर केली. येडीयुराप्पांसारखे लिंगायत समाजात मोठा मान असलेले नेते दूर झाले तेव्हा त्यांच्या जागी शेट्टरांनाच आणले गेले ते त्यांच्या लिंगायत असण्यामुळे. लिंगायत, वोक्कळिग, कुरुबा, दलित अशा विविध समाजांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व भाजपाने आपल्या गाठीशी बांधून आजवर सत्ताशकट हाकले. परंतु सध्याच्या बंडाळीच्या वावटळीत ही समिकरणे उलटीपालटी होऊ लागली आहेत. येडीयुराप्पांच्या नव्या प्रादेशिक पक्षाचे कर्नाटकमधील आगामी राजकारणातील महत्त्व ते भाजपामध्ये ते किती मोठे खिंडार पाडू शकतात त्यावर अवलंबून असेल. सत्तेची गणिते जुळवून आणण्यात ते वाकबगार आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावर कुमारस्वामींचे सरकार आणले होते ते येडीयुराप्पांनीच. नंतर कुमारस्वामींनी सत्तांतराचा शब्द पाळला नाही हा भाग वेगळा. रेड्डी बंधूंची बंडाळीही येडींनी कशी लीलया मोडून काढली तेही सर्वांपुढे आहेच. अशा व्यक्तीच्या उपद्रवी कारवायांना भाजप आगामी काळात कर्नाटकमध्ये पुरून उरेल का, हा खरा सवाल आहे. प्रश्न केवळ सध्याचे सरकार टिकवण्याचाच नाही. दक्षिणेकडील राज्यांतील आपले पहिलेवहिले सरकार असे धुळधाण उडून जाताना जनतेने पाहिले तर येणार्‍या निवडणुकीत तिची प्रतिक्रिया काय असेल याचा विचारही भाजपाला करावा लागणार आहे. येडीयुराप्पा वजा भाजप या गणिताचे उत्तर शून्य नाही हा विश्वास जनतेला देण्याची जबाबदारी आता पक्षनेतृत्वावर आहे. कर्नाटकमधील बंडाळीचे नाटक आता अंतिम अंकापर्यंत येऊन ठेपलेले आहे. आता सारे काही आमनेसामने असेल. येडीयुराप्पांची सरशी होऊ न देण्यासाठी भाजपा काय करते हे येत्या दोन दिवसांत दिसेल.