कर्नाटकच्या व्यावसायिकाचाकळंगुटमध्ये संशयास्पद मृत्यू

0
13

कळंगुट येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील मालपे-उडुपी येथील वॉटर स्पोर्ट्स बोट व्यावसायिक व पर्यटक संदीप सलायम मालपे यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मृताच्या गळ्यातील सोन्याची साखळीही गायब असल्याचे समोर आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टमधील खोलीत संदीप मालपे हे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, संदीप मालपे हे आपल्या भावंडे व मित्रांसह कर्नाटकातील उडुपी येथून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. 29 जून रोजी त्यांनी एका कॅसिनोला भेट दिली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी सर्वजण कळंगुट येथे आले. संदीप यांच्यासोबत एक महिला होती. त्यामुळे ते दोघे संबंधित रिसॉर्टमध्ये थांबले, तर त्यांचे भाऊ व मित्र अन्य हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
त्यानंतर मंगळवारी रात्री संदीप यांचा मृतदेह खोलीत आढळून आला, तर त्यांच्यासोबत असलेली महिला तेथे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला आहे.