तहसीलदारांना निवेदन सादर
खानापूर येथे शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारच्या भांडुरा नाला प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. भांडुरा नाला प्रकल्पाला विरोध करणारे निवेदन खानापूरच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारने खानापूर भागातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकरी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर येथे बैठक घेण्यात आली. कर्नाटक सरकारने भांडुरा नाला प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईचे पाणी वळवून मलप्रभा नदीत सोडण्याची योजना तयार केली आहे.
म्हादईचे पाणी वळविण्यासाठी भांडुरा नाला प्रकल्पाचे बांधकाम केल्यास खानापूर तालुक्यातील जैवसंवेदनशील विभागावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बैठकीत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्यासंबंधीच्या आंदोलनाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली आहे. खानापूर नगरपालिका, तालुक्यातील ग्रामपंचायती यांनी भांडुरा प्रकल्पाच्या विरोधात ठराव संमत करावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारने जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोव्याने दखल घ्यावी ः केरकर
कर्नाटक सरकारच्या म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पांना कर्नाटक राज्यात हळूहळू विरोध होऊ लागला आहे. गोवा सरकारने या प्रकाराची दखल घेऊन म्हादई रक्षणार्थ योग्य नियोजन करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले.

