कर्जबुडव्यांकडील 58000 कोटी थकित

0
19

केंद्र सरकारची संसदेत माहिती; 19187 कोटी वसूल

भारतातील बँकांचे पैसे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांबाबत केंद्र सरकाने सोमवारी अत्यंत महत्त्वाची महिती संसदेत सादर केली. सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ही एकूण थकित रक्कम 58000 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये मूळ रक्कम आणि इतक्या वर्षांमध्ये साठलेले व्याज या दोन्हींचा समावेश आहे. तसेच, बँकांनी वेगवेगळ्या मालमत्तांची जप्ती आणि विक्रीतून 19187 कोटी रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे, असे केंद्र सरकारने सांगितले.
भारतीय बँकिंग सिस्टिमची फसवणूक करणाऱ्या काही हाय-प्रोफाइल नावांचा देखील समावेश आहे. यामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संदेसरा फॅमिली यांचा समावेश आहे.

विजय मल्ल्याकडून विविध बँकांचे 22065 कोटी रुपये देणे बाकी आहेत. ज्यापैकी बँकांनी 14000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मालमत्ता जप्त आणि विक्री करून वसूल केली आहे. नीरव मोदी याच्याकडून 9656 कोटी रुपये येणे बाकी आहेत आणि इतर असेच अनेक गुन्हेगार मिळून 58000 कोटी रुपये येणे बाकी आहेत. बँकेने नीरव मोदीकडून आत्तापर्यंत 545 कोटी रुपये परत मिळवले आहेत, असे सरकारने संसदेत सांगितले आहे.