कर्करोगावरील औषधे मिळणार स्वस्तात

0
14

>> राज्य सरकारकडून पीपीआयएसटी धोरण जाहीर; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते औषध खरेदी धोरणाचा शुभारंभ

राज्यातील कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक उच्च दर्जाची आणि महागडी औषधे कमी किमतीमध्ये उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने पीपीआयएसटी (प्रायसिंग पॉलिसी फॉर इनोव्हेटिव्ह लाईफसेव्हिंग थेरपीज) धोरण जाहीर केले आहे. हे धोरण जाहीर करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असून, या धोरणांतर्गत राज्य सरकारकडून महागडी औषधे 70 ते 80 टक्के कमी दराने खरेदी करून रुग्णांना दिली जाणार आहेत. या धोरणामुळे सरकारच्या औषध खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली.

क्यूअर एआय आणि एस्ट्राझेनिका कंपनीच्या सहकार्याने आयोजित एका कार्यक्रमात कर्करोग औषध खरेदी धोरणाचा शुभारंभ आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य सचिव अरुणकुमार मिश्रा, गोमेकॉचे डीन डॉ. जयप्रकाश तिवारी, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, क्यूअर एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत वॉरियर, डॉ. अजय शर्मा व इतरांची उपस्थिती होती.

राज्य सरकारकडून कर्करोग रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. 2024 पासून राज्यातील 18 इस्पितळे आणि आरोग्य केंद्रात एआय पध्दतीने रुग्णांच्या फुप्फुसाचे एक्स-रे घेतले जात आहेत. आत्तापर्यंत सुमारे 70 हजार रुग्णांचे एक्स-रे घेण्यात आले आहेत. त्यात 6 हजार जणांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले, तर 500 जणांना फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील सरकारी इस्पितळामध्ये आत्तापर्यंत सुमारे 70 हजार रुग्णांच्या छातीचे एक्स-रे एआय पद्धतीने घेण्यात आले आहेत. या तपासणीमध्ये एखाद्या रुग्णाला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यास नवीन औषध खरेदी धोरणाखाली त्या रुग्णावर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती क्यूरल एआयचे सीईओ प्रशांत वॉरियर यांनी दिली.

नव्या धोरणामागे उद्देश काय?
कर्करोगाच्या उपचारासाठी वार्षिक सुमारे 50 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. राज्यातील सामान्य नागरिक हा खर्च पेलू शकत नाही. त्यामुळे राज्यातील कर्करोग रुग्णांना दिलासा देण्यासाठी औषध खरेदीचे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. फुप्फुसाच्या कर्करोग उपचारापासून या धोरणाचा प्रारंभ केला जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.