>> यंदाचा पहिला नोबेल पुरस्कार वैद्यकशास्त्र क्षेत्रासाठी जाहीर; 10 डिसेंबरला वितरण
जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान असणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली असून, पहिला नोबेल पुरस्कार वैद्यकशास्त्र क्षेत्रासाठी जाहीर झाला आहे. कोरोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ज्ञ कॅटलिन करिको व ड्र्यू वेसमन यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वीडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको व वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
वर्षभरात मानवतेसाठी मोलाचे कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येते. हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यंदाच्या वर्षीच्या नोबेल पुरस्करांची घोषणा होण्यास वैद्यकशास्त्रातील पुरस्काराने सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. 1901 साली हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यावर्षी सर अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये एका समारंभात स्वीडनच्या राजाच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.
कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली ‘एमआरएनए’ लस विकसित करणे शक्य झाले. त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे एमआरएनए ही लस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते याबाबत माहिती मिळवण्यास मदत झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 2023चा वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
नोबेल पुरस्काराचे स्वरूप काय?
नोबेल पारितोषिक विजेत्यांना डिप्लोमा, एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे 7,57,64,727 रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते. एका श्रेणीमध्ये एकापेक्षा जास्त विजेते असल्यास बक्षीस रक्कम ही त्यांच्यामध्ये विभागली जाते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 10 डिसेंबर रोजी विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.