करंजाळेतील छाप्यात ईडीकडून कागदपत्रे जप्त

0
10

सक्तवसुली संचालनायाच्या (ईडी) गोवा विभागाने करंजाळे येथील एका जमीन हडप प्रकरणात मॉडेल्स रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे मालक आणि करंजाळे येथील कार्यालयावर मंगळवारी मनी लॉड्रिंग अंतर्गत छापा टाकला होता. या छाप्यातील कारवाईचा तपशील ईडीने काल उघड केला. या छाप्यात विविध गुन्हेगारी साहित्य, डिजिटल उपकरणे, 2 फेब्रुवारी 2007 रोजीचा विक्री आणि खरेदी करार आणि यूएई (दुबई) येथील दिवंगत पीटर वाझ यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे मालकी हक्क असलेले दस्तऐवज ताब्यात घेतले, असे ईडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पणजी पोलिसांनी करंजाळे येथे जमीन हडप प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. करंजाळे येथील तानू गावस या मुंडकाराकडील शेतजमीन बेकायदेशीरपणे हडप करण्यात आलेली आहे. संशयित आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून ही जमीन हडप केली आहे, असे ईडीने म्हटले आहे.
ईडीकडून मनी लॉड्रिंग अंतर्गत या जमीन हडप प्रकरणाचा तपास केला जात आहे. करंजाळे येथील डायगो वाझ आणि नातालिना वाझ यांच्या निवासस्थानाबरोबरच मॉडेल्स रिअल इस्टेटच्या सांतइनेज येथील कार्यालयावर छापा घालून तपासणी करण्यात आली. डिजिटल दस्तऐवजाची पडताळणी केली असता या प्रकरणामध्ये युएईमधील गुंतवणूकदारांचा संबंध असल्याचे समोर आले आहे, असेही ईडीच्या पत्रकात म्हटले आहे.