Home बातम्या कन्हैय्याला कठोरातील कठोर सजा व्हावी

कन्हैय्याला कठोरातील कठोर सजा व्हावी

0

– प्रल्हाद नायक, कुडचडे

भारतीय संस्कृतीने गुरु-शिष्याच्या नात्याला पवित्र मानले आहे. गुरूः ब्रह्मा गुरुः विष्णू गुरुः देवो महेश्‍वरः| गुरूः साक्षात परःब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः| याचाच अर्थ असा की भारतीय संस्कृतीने गुरूला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परब्रह्माचे स्थान दिलेले आहे. गुरू हे सन्मानाचे, आदराचे पद आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत गुरू द्रोणाचार्य-एकलव्य, स्वामी रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, संत रामदास-शिवाजी महाराज, रमाकांत आचरेकर- सचिन तेंडुलकर अशा प्रसिद्ध गुरू शिष्यांच्या जोड्या आहेत. पूर्वीच्या काळात गुरू चांगले आचार-विचार, मार्गदर्शन देऊन शिष्याला चांगला नागरिक बनवायचे. विद्यादान हे पवित्रदान मानले जायचे. दुसर्‍याला दिल्याने वाढणारे ते एकमेव असे दान आहे.

पूर्वीच्या काळी शिष्य गुरूगृही राहून शिक्षण घेत असत. गुरुगृही पडेल ती कामे करून शिक्षण घेत गुरू शिष्यांना सर्व विद्यांत पारंगत करीत असत. कालांतराने शिक्षण पद्धतीत बदल होत गेला. गावोगावी शाळा, विद्यालये उभी राहिली. गुरूची जागा शिक्षकांनी घेतली. शिक्षक विद्यार्थी शाळा विद्यालयात भेटू लागले. गुरूकुल पद्धत मागे पडली.

स्त्री – शिक्षणाचा प्रसार होऊन मुली शिक्षणासाठी घराबाहेर पडू लागल्या. समाज जसा सुशिक्षित होऊ लागला, साधनसुविधांची, विज्ञानाची, सुखोपयोगी गोष्टींची वृद्धी होत गेली तसा माणसांच्या आचार-विचारांत बदल होत गेला. माणसांमध्ये विकृती निर्माण झाली.

वडील-कन्या, शिक्षक-विद्यार्थिनी अशा पवित्र नात्यांमध्ये बदलाव येऊ लागला. मुलगी वडिलांपासून, विद्यार्थिनी शिक्षकापासून सुरक्षित असेल याची खात्री देता येत नाही. घर ही पहिली शाळा तर शाळा हे मुलांचे दुसरे घर झाले आहे म्हणतात. शिक्षक हा वडिलांसमान असतो. आपले पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे आदर्श शिक्षक होते. त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. आजही समाजात चांगले आदर्श शिक्षक आहेत. तुलनात्मकदृष्ट्या आदर्श शिक्षकांची संख्या अत्यल्प असल्यामुळे त्यांचा प्रभाव दिसत नाही. शिक्षक आणि विद्यार्थिनी, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे सर्रास दिसतात. शिक्षक आणि विद्यार्थिनींची अनेक विवाहप्रकरणे आहेत.

समाजाची मानसिकता, रुची, विचार बदललेले आहेत. समाजरुपी समुद्राचे पाणी खराब, गढूळ झालेले आहे. गढूळ समुद्रातील बादलीभर पाणी स्वच्छ असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, हे मला मान्य आहे. परंतु आजकाल शाळा विद्यालयांतून ज्या अनैतिक गोष्टी घडतात, त्या पाहता मुले शाळा, विद्यालयात सुरक्षित नाहीत हे दिसून येते. शिक्षक आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनींच्या अवयवांबद्दल मिटक्या मारून बोलतात, मटका, गुटखा, दारुचे व्यसन असलेले अनेक शिक्षक आहेत हे पाहून वाईट वाटते. सध्या पणजीतील एक सोळा वर्षांची नेपाळी मुलगी तिचा शिक्षक कन्हैया नाईक (४५ वर्षे) याच्या वासनेला बळी पडली. तिच्या पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सदर शिक्षकाला अटक केली. सदर शिक्षकाची एक महिन्यानंतर जामिनावर सुटका होताच त्या मुलीने स्वतःला पेटवून घेतले. ती विद्यार्थिनी कुठली होती, तिची आर्थिक परिस्थिती काय होती हे प्रश्‍न दुय्यम असून एका वासनांध शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला यमसदनी पाठवलं, हे संतापजनक वास्तव आहे. कोणताच दोष नसताना फक्त एका नराधमाने केलेल्या कृत्याची शिक्षा एका निरागस मुलीला भोगावी लागली. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया येत असल्या तरी ज्या प्रमाणात या घटनेची समाजाने दखल घ्यायला पाहिजे होती, शिक्षक वर्गाने पेटून उठून सदर शिक्षकाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे पाहायला पाहिजे होते, ते घडताना दिसत नाही.

शिक्षणाचा झालेला धंदा, समाजाची उदासीनता, मौजमस्ती आणि चंगळवादाकडे झुकणारी विचारसरणी, बिघडलेली सुव्यवस्था, पुरुषप्रधान संस्कृती, कायद्याची न राहिलेली भीती यांच्यातूनच महानंद नाईक, कन्हैया नाईक तयार होत असतात.

शिक्षण खात्याबरोबरच गृहखाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वतः लक्ष घालून कन्हैया नाईक याला कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्या मुलीच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा.