कधी आवळणार मुसक्या?

0
228
  • ऍड. प्रदीप उमप

रिझर्व्ह बँक आणि गृह मंत्रालयाने एटीएमच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम आणि मार्गदर्शक सूत्रे जारी केली असली, तरी एटीएमच्या माध्यमातून ङ्गसवणूक, एटीएम लुटणे अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडतच आहेत. अशा घटनांचा तपास करणार्‍या पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बँक आणि पोलिस या दोहोंच्या बेङ्गिकिरीचा हा परिणाम असून, अशा घटना रोखल्या नाहीत, तर आगामी काळात प्रचंड आर्थिक नुकसान संभवते.

एटीएम लुटल्याच्या घटना जवळजवळ दररोज देशभरात कुठे ना कुठे घडल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. अशा घटनांचे सीसीटीव्ही ङ्गुटेजही अनेकदा टीव्हीवर दिसते, परंतु अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. याच कारणामुळे चोरी आणि लुटालुटीसारख्या घटना गुन्हेगार बिनदिक्कतपणे करीत आहेत.

गुन्हेगारांचे मनोबल आजकाल एवढे वाढले आहे की, मनात येईल तेव्हा दिवसाढवळ्यासुद्धा ते एटीएममधून लुटालूट करतात आणि सहजगत्या ङ्गरारही होतात. असे गुन्हे करणारे लुटारू विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात उभारण्यात आलेली एटीएम लक्ष्य करतात असे दिसून आलेले आहे. अशी लुटालूट करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या देशाच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहेत.

अनेकदा या टोळ्यांचे धाडस एवढे वाढते की, एटीएमच्या सुरक्षारक्षकावर नियंत्रण मिळवून ते लुटालूट करतात किंवा चक्क एटीएम मशीनच उचलून नेतात. त्यामुळे चोरी किंवा लूट झाल्याची सूचना देणारा अलार्म वाजत नाही आणि मशीनच्या तारा तोडल्यामुळे नियंत्रण कक्षालाही सूचना मिळू शकत नाही. अशा प्रकारच्या लुटीच्या घटना घडल्यानंतर तपास करणार्‍या पोलिसांच्या कार्यशैलीबद्दलही आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अर्थात, एटीएमची लूट हा केवळ पोलिसांच्याच नव्हे तर बँकेच्याही बेङ्गिकिरीचा परिणाम आहे. सुरक्षाविषयक निकष आणि दिशादर्शक सूचनांकडे डोळेझाक केल्यामुळे बँक लुटीच्या घटनांपाठोपाठ आता एटीएम लुटीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. अशा तर्‍हेच्या घटना रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाने अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत एटीएमचा वापर वाढला आहे आणि त्याबरोबरच एटीएमच्या माध्यमातून ङ्गसवणुकीच्या तसेच लूट, चोरी, दरोडा अशा घटनांमध्येही बरीच वाढ झाली आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून सप्टेंबर २०१९ अखेर अशा सुमारे ५० हजार घटना घडल्याची नोंद पोलिसदप्तरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अशा घटनांमुळे बँकांनाही कोट्यवधींचा ङ्गटका सहन करावा लागला आहे.

एटीएमच्या माध्यमातून ङ्गसवणूक, चोरी, दरोडा आणि लूट यासंदर्भात उपलब्ध आकडेवारीची तुलना केली असता २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंत या घटनांची संख्या काही शेकड्यांमध्ये होती, परंतु २०१९ उजाडले तेव्हा हजारोंच्या संख्येने अशा घटना घडू लागल्या. एकंदर आकडेवारी पाहिल्यास, पाच वर्षांत देशभरात एटीएमसंदर्भातील गुन्ह्यांच्या ४९,९०२ घटना घडल्याची नोंद झाली आहे.

माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना राजस्थान, महाराष्ट्र, हरियाना, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत घडल्या आहेत. गोव्यामध्ये देखील एटीएम लुटण्याच्या, पळवून नेऊन पैसे पळवण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात एटीएमच्या साह्याने ङ्गसवणूक करण्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे तर देशाची राजधानी दिल्ली दुसर्‍या स्थानावर आहे.

एटीएम मशीनच्या देखभालीचा विचार करता एटीएममध्ये रोकड भरणे, एटीएम मशीनचे झिरो डाउन होणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दृश्य आणि अदृश्य कॅमेरे सक्रिय असणे, एका वेळी एकच ग्राहक एटीएममध्ये असावा या दृष्टीने दरवाजे बंद राहणे, रात्रीच्या वेळी उजेडाची पुरेशी व्यवस्था, सुरक्षिततेसाठी रक्षक हे देखभालीतील प्रमुख घटक आहेत आणि त्यांचे पूर्णांशाने पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच दररोज आपल्याला कोणते ना कोणते एटीएम ङ्गोडल्याच्या बातम्या ऐकायला, पाहायला मिळत असतात.
देशभरात बँकांकडून एटीएममध्ये रोकड भरतेवेळी लुटीच्या घटना रोखण्यासाठी गृह मंत्रालयाकडून अनेक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, देशभरातील कोणत्याही एटीएममध्ये रात्री नऊनंतर रोकड भरता येत नाही. ग्रामीण भागातील एटीएममध्ये सायंकाळी सहानंतर रोकड भरणा करता येत नाही. त्याचबरोबर नक्षल प्रभावित भागांत दुपारी चारपर्यंतच एटीएममध्ये रोकड भरण्याचे निर्देश आहेत. कॅश व्हॅन, कॅश वॉल्ट लुटणे तसेच एटीएमच्या माध्यमातून होणारी ङ्गसवणूक तसेच अन्य दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ही पावले उचलली आहेत.

देशभरात खासगी क्षेत्रातील सुमारे ८००० कॅश व्हॅन रोकड वाहून नेण्याचे काम करतात. या कॅश व्हॅनच्या माध्यमातून दररोज सुमारे १५००० कोटींची रक्कम विविध एटीएममध्ये भरण्यासाठी वाहून नेली जाते. त्याचबरोबर कोणत्याही एका कॅश व्हॅनमधून एका वेळी पाच कोटींपेक्षा अधिक रोकड वाहून नेता येत नाही. खासगी कॅश व्हॅन चालविणार्‍या कंपन्या रोकड वाहून नेण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करताना पोलिसांकडून सखोल चौकशी केली गेल्याशिवाय करू शकत नाहीत.

सरकार आणि रिझर्व्ह बँकेने भरपूर प्रयत्न केल्यानंतरही एटीएम लुटीच्या घटना सतत कुठे ना कुठे घडतच आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. बँका आपल्या एटीएमच्या सुरक्षेकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत असेही आढळून येत आहे. अनेक एटीएममध्ये तर सुरक्षारक्षकच नसतो. त्यामुळे अशी सुरक्षारक्षक विरहित एटीएम अशा गुन्हेगारांच्या पथ्थ्यावरच पडत आली आहेत. वाढत्या एटीएम गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन आताच योग्य पावले टाकून अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या नाहीत, तर आगामी काळात केवळ अशा गुन्हेगारी घटनांची संख्याच वाढताना दिसेल आणि नुकसानीचा आकडाही ङ्गुगत राहील.