मुख्यमंत्र्यांची माहिती; ‘माझी बस’साठी खासगी बसमालकांना 25 हजारापर्यंत अनुदानाचा विचार
कदंब महामंडळाकडून प्रवाशांसाठी ट्रांझिट कार्ड सुरू केले जाणार आहे. हे कार्ड कदंबच्या सर्व बसगाड्यांमध्ये वापरता येणार आहे. तसेच राज्य सरकारच्या ‘माझी बस’ योजनेत सहभागी होणाऱ्या खासगी बसमालकांना देण्यात येणारे अनुदान 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याचबरोबर कदंब महामंडळाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांची थकबाकी आगामी तीन महिन्यांत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी बसस्थानकावर आयोजित कदंब महामंडळाच्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना काल दिली.
या कार्यक्रमाला वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर, वाहतूक खात्याचे संचालक परिमल अभिषेक, कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर आणि इतरांची उपस्थिती होती.
खासगी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के बस तिकिट सवलत सुरू केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी माझी बस योजनेमध्ये बदल केले आहेत. माझी बस योजनेखाली नोंदणी केलेल्या खासगी बसमालकांना आत्तापर्यंत 2 कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आहे. सध्या या योजनेत बसमालकांना दरमहा 18 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. आगामी काळात अनुदान 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, खासगी बसमालकाला नवीन बस खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे खासगी बसमालकांनी या योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कदंब महामंडळ हे गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे कदंब महामंडळ नफ्याकडे नाही, तर सेवेकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. ज्या भागात खासगी बसगाड्या जात नाहीत. त्या भागात कदंबाच्या बसगाड्या वाहतूक करतात. कदंब महामंडळाकडे 550 बसगाड्या असून, त्या राज्य आणि राज्याबाहेर वाहतूक करतात. कदंब महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सवलत दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
थकबाकी 3 महिन्यांत देणार : मुख्यमंत्री
कदंब महामंडळाच्या सेवानिवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीचा प्रश्न विचारात घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत 50 टक्के थकबाकी वितरित करण्यात आली आहे. उर्वरित थकबाकी तीन महिन्यांत दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कदंब महामंडळाचे येत्या 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. आधुनिकीकरणानंतर प्रवाशांना ॲपच्या माध्यमातून कदंब बसचे थेट ट्रॅकिंग करता येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.
2027 पर्यंत 280 जुन्या बस भंगारात
कदंब महामंडळाकडून 2027 पर्यंत जुन्या 280 बसगाड्या भंगारात काढण्यात येणार असून, नवीन 100 इलेक्ट्रिक बसगाड्या सेवेत घेतल्या जाणार आहेत. राज्यातील प्रमुख बसस्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास केला जाणार आहे. पर्वरी येथे कदंब महामंडळाच्या नवीन मुख्यालयाचे बांधकाम गोवा पायाभूत विकास महामंडळाकडून हाती घेण्यात येणार आहे, असे उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

