कंत्राटदाराकडूनच अटल सेतूची दुरुस्ती करून घेणार : मुख्यमंत्री

0
12

पणजी शहरातील ‘अटल सेतू’वरील रस्त्यावर घातलेला डांबर टिकत नसून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे हे काम केलेल्या कंत्राटदाराला हा डांबर काढून टाकून स्वखर्चाने हा रस्ता सिमेंटचा तयार करण्याचा आदेश देण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

कॉंग्रेस आमदार कार्लूस ङ्गेरेरा यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना मायकल लोबो म्हणाले की, राज्यात कितीतरी पूल आहेत; पण कुठल्याही जुन्या पुलावरील डांबर अशा प्रकारे उखडला जात नसून, या नव्या पुलावर मात्र कितीही डांबर घातला तरी तो टिकत नाही. परिणामी हा पूल वाहतुकीसाठी धोक्याचा ठरला आहे. विशेष म्हणजे सल्लागाराची मदत घेऊन हे काम करण्यात आले होते, ही बाबही लोबो यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिली. या सल्लागारावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गिरी येथील फ्लाय ओव्हर देखील आता निसरडा झाल्याचे लोबो व ङ्गेरेरा यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. सदर कंत्राटदारांवर कारवाईची मागणी या द्वयींनी यावेळी केली.