राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींची स्थिती मार्च २०१३ पर्यंत सुधारण्याचे आश्वासन उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासाला गोवा विधानसभेत दिले.
डिचोली येथील औद्योगिक वसाहतीचा दर्जा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न आमदार नरेश सावळ यांनी विचारला होता. त्यावर बोलताना महादेव नाईक यांनी वरील आश्वासन दिले.
गोवाभरातील औद्योगिक वसाहतींना भेट देणे आपण सुरू केले असून लवकरच डिचोली औद्योगिक वसाहतीला भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींची सुधारणा घडवून आणून त्यांचा दर्जा वाढवण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. औद्योगिक वसाहतींच्या संघटनांशी चर्चा करून त्याबाबत एक कृती योजनाही तयार करण्यात येणार असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नरेश सावळ यांनी डिचोली औद्योगिक वसाहतीची पार दुर्दशा झाली असल्याचे सभागृहाच्या नजरेत आणून दिले. या वसाहतीतील रस्त्यांना असंख्य खड्डे पडलेले असून रस्त्यांची पार वाट लागली आहे, वसाहतीत विजेचीही चांगली सोय नसून वीज पुरवठा परत परत खंडित होत आहे, कँटीन तीन वर्षांपासून बंद पडलेले आहे, प्रदूषणामुळे तेथील पाणी प्रदूषित झालेले आहे, वसाहतीतील पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्या वेळी तेथे अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचे सावळ यांनी सांगितले. ताबडतोब लक्ष घालून या सुविधांत सुधारणा करण्याची मागणीही सावळ यांनी यावेळी केली. त्यावर सर्व औद्योगिक वसाहतींबरोबरच डिचोली औद्योगिक वसाहतीचाही दर्जा सुधारण्याचे आश्वासन मंत्री महादेव नाईक यांनी दिले.