ओल्ड गोव्यातील बांधकामास मायकल लोबोंचा तीव्र विरोध

0
6

>> ४८ तासांत परवाना रद्द करण्याची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओल्ड गोवा येथील वारसा स्थळाच्या बफर झोनमधील वादग्रस्त बांधकामाचा परवाना येत्या ४८ तासात रद्द करावा, अशी मागणी कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी काल केली. या मागणीची पूर्तता न केल्यास राज्यभर होणार्‍या आंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवावी, असाही इशारा यावेळी मंत्री लोबो यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत या वादग्रस्त बांधकामप्रश्‍नी निर्णय घेत नसतील, तर राज्यभरातील नागरिक या वादग्रस्त बांधकामाबाबत निर्णय घेतील, असे मंत्री लोबो यांनी म्हटले आहे. या वादग्रस्त बांधकामावर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वादग्रस्त बांधकामप्रश्‍नी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केले जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

या वादग्रस्त बांधकामाला विरोध करण्यासाठी राज्यभरातील नागरिक ओल्ड गोवा कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. या समितीकडून वारसा स्थळातील या वादग्रस्त बांधकामावर कारवाईसाठी आंदोलन केले जात आहे, असेही मंत्री लोबो यांनी म्हटले आहे.