मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून स्पष्ट
टॅक्सी मालकांच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ाज्य सरकाराने राज्यातील टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता आणि दरात समानता आणण्यासाठी ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. ओला, उबर किंवा अन्य बाहेरील कॅब ॲग्रीगेटर कंपन्यांना गोव्यात आणण्याचा कोणताही उद्देश नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे मंत्रालयात काल केले.
राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने वाहतूक ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा जारी केल्यानंतर टॅक्सी व्यावसायिकामध्ये खळबळ माजली आहे. टूरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांकडून ॲग्रीगेटरला विरोध केला जात आहे. आमदार मायकल लोबो, आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी मालकांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पर्वरी येथे मंत्रालयात भेट घेऊन वाहतूक ॲग्रीगेटर या विषयावर चर्चा करून कॅब ॲग्रीगेटर नियुक्तीच्या विषयाबाबत चिंता व्यक्त केली होती.
विश्वासात घेऊनच तोडगा
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, ॲग्रीगेटर या विषयावर निर्णय घेताना आमदार, स्थानिक टॅक्सी व्यावसायिक, हॉटेल उद्योग प्रतिनिधी अशा सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच तोडगा काढण्यात येणार आहे, असे सांगितले.
गोव्यात एकसमान दर असणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने प्रस्तावित ॲग्रीगेटर मसुदा सध्या स्थगित ठेवावा आणि भाड्याचे दर ठरवताना सर्व घटकांना विश्वासात घ्यावे. राज्यात टॅक्सी व्यवसाय स्थानिकांकडे राहिला पाहिजे. ॲग्रीगेटर कंपन्यांना ठाम विरोध आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक टॅक्सी व्यवसायाच्या हितासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याबाहेरच्या कंपन्यांना संधी दिल्यास स्थानिक टॅक्सी उद्योग धोक्यात येईल, असे आमदार आरोलकर सांगितले. अग्रीगेटर या विषयावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने टॅक्सी व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ॲप अग्रिगेटर आणला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. टॅक्सी मालकांचा ॲप अग्रिगेटरचा विरोध आहे. आम्ही ॲपमध्ये सहभागी होणार नाहीत. ॲप टॅक्सी गोव्यात उपयुक्त नाही. त्यामुळे टॅक्सी व्यावसायात सुसूत्रता आणण्यासाठी कुठली व्यवस्था केली जाणार आहे याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असे टॅक्सी मालकांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

