ओला, उबरला गोव्यात परवानगी नाही : मुख्यमंत्री

0
16

ओला आणि उबर यासारख्या ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना गोव्यात आपला व्यवसाय सुरू करण्यास गोवा सरकारने परवानगी दिलेली नाही, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली.

काल शून्य तासाला आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी गोव्यात ‘उबर’चा टॅक्सी व्यवसाय चालू असल्याची माहिती विधानसभेत दिली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री सदर कंपनीला सरकारने गोव्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
उबरचे टॅक्सीचालक प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करुन राज्यात व्यवसाय करीत आहेत. गोव्यातील काही टॅक्सीचालकांनी टॅक्सीसह उबरच्या टॅक्सीचालकाला पकडून कोलवा पोलीस स्थानकात नेल्याची माहिती यावेळी व्हेन्झी व्हिएगस यांनी विधानसभेत दिली. त्यावर बोलताना त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

उबरचालकाविरोधात गुन्हा नोंद

मोपा विमानतळावर परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी उबरचा एक टॅक्सीचालक आणि उबर व्यवस्थापनाविरुद्ध मोपा विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तशा प्रकारची तक्रार सहाय्यक वाहतूक संचालक संतोष गावडे यांनी मोपा पोलिसांत नोंदवली होती. चालक देवेंद्र सातार्डेकर याने जीए-06-टी-8723 क्रमांकाच्या टॅक्सीतून राज्य परिवहन विभागाकडून आवश्यक परवाना न घेता उबर मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना सेवा दिली. ही बाब गोव्यातील वाहतूक कायदे आणि नियमांचे उल्लंघन आहे.