‘ओमिक्रॉन’ ः चिंताजनक उप-प्रकार

0
26
 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज- पणजी)

प्रत्येक व्हेरियन्ट म्हणजेच उप-प्रकारापासून सुरक्षित राहता येते. सुरक्षा प्रतिबंधक उपायांची कास सोडू नका. सर्वांनी आज, आत्ता, या क्षणापासून नियम पुन्हा व्यवस्थित पाळा व स्वतःची, कुटुंबाची व समाजाची सुरक्षा वाढवा.

कोरोनाची भीती आता टळली आहे, भारतात तरी सर्वाधिक लसीकरण पार पडले; आता आपल्याला भीती नाही; लॉकडाउन पूर्ण शिथिल होऊन सगळे आपापल्या कामधंद्याला लागले आहेत. मुलंही काही अंशी मुक्तपणे बागडताना – खेळताना दिसत आहेत. शाळा-कॉलेज अर्धवट म्हणा.. सुरू झाल्यात. पूर्वीप्रमाणे सगळे सुरळीत सुरू होणार हा आनंद साजरा करण्याच्या आतच सर्व आनंदावर विरजण पडते आहे असे वाटते. ‘ओमिक्रॉन’ या नवीन व्हायरसचे नाव कानावर पडते आहे. तेव्हा जनसामान्यांमध्ये विस्कळीत मिश्र प्रतिसाद दिसत आहेत.

काहींच्या मते उगाचच सरकारचा स्टंट; काहींच्या मते लसीकरण घेतलंय, आता काही होणार नाही, काहींच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षा जास्त घातक, काही म्हणतात.. जे होईल ते बघुया… असे प्रत्येकजण आपापल्या परीने तर्क- वितर्क करीत आहेत.
कोरोनासोबत जवळजवळ दोन वर्षे लढा देऊन मिळवलेली सुरक्षा या बदलांमुळे पणाला लागू नये अशीच सर्व जणांची इच्छा आहे. कोरोनाने रूप बदलले का? ओमिक्रॉन हा दुसरा व्हायरस आहे का? ओमिक्रॉन हा डेल्टानंतरचा उप-प्रकार आहे का?
पुढील काही दिवसात या व्हायरसबद्दल अधिक माहिती मिळेलच. तूर्तास जी माहिती मिळाली ती थोडीफार जाणून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे कोरोनाची भीती परत वाढू नये व त्यानुसार निर्णय काही घेतले जाऊ नये.

जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला इ.१.१.५२९ असे म्हटले असून त्याला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या नव्या विषाणूवरून धोक्याचा इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत हा नवीन कोरोना व्हेरियन्ट समोर आला आहे.

ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू आहे. हा विषाणू खूपच धोकादायक आहे. आणि लसीकरण झालेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होऊ शकतो, असे जा. आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारापेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे. हा नवीन प्रकार व्हायरसच्या वर्तनातच बदल करतो. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप धोकादायक ठरू शकते. संसर्गाची तीव्रता निश्‍चित करण्यासाठी जगभरातील तांत्रिक सल्लागार गट या नवीन प्रकारावर सतत लक्ष ठेवून आहेत.
ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत?
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या मते लक्षणांमध्ये….

 • जास्त थकवा
 • सौम्य स्नायुदुखी
 • घसा खवखवणे
 • कोरडा खोकला…
  यांचा समावेश आहे तर काही प्रकरणांमध्ये फक्त उच्च ताप दिसून येतो. हो.. पण त्यांच्या मते रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती न होता पूर्ण बरा होण्यास सक्षम आहे. त्यांच्या मते ओमिक्रॉन- चाळीस किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांना संक्रमित करत आहे. तसेच ओमिक्रॉनची लक्षणे ज्या ज्या रुग्णात दिसून आली त्यांनी किंवा निम्म्याहून अधिक रुग्णांनी कोरोनाची लस घेतली नव्हती असे आढळते. याचाच अर्थ लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.
 • ओमिक्रॉनने बाधित बहुतेक रुग्णांमध्ये तीव्र थकवा, सोबत डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात.
 • आत्तापर्यंत या व्हेरियन्टमुळे वास न येणे.. यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकारच्या तपासणीबाबत सांगताना आरोग्य संघटनेने सांगितले की सध्या डअठड – उेत-२ झउठ हा व्हेरियंट पकडण्यात सक्षम आहे. या नव्या व्हेरियन्टमुळे भारतासह इतर देशही सतर्क झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेहून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. तसेच त्यांची चाचणी करणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे इतर देशातून येणार्‍या प्रवाशांनाही आता क्वारंटाइन अनिवार्य करण्यात येणार आहे. प्रत्येक आठ दिवसात आर्‌टीपीसीआर् तपासणी करण्यात येणार आहे.

हा विषाणू बलवान किंवा ओमिक्रॉनला तातडीने तेउ (व्हेरियन्ट ऑफ कंसर्न) चा दर्जा दिला आहे म्हणजे…
१. विषाणूची प्रसारक्षमता वाढते – यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. संपूर्ण कुटुंबं बाधित होतात किंवा..
२. विषाणू संसर्ग क्षमता/ गंभीरता वाढते. आजाराची गंभीरता किंवा मृत्यूचा धोका वाढतो. किंवा…
३. रोगप्रतिकारशक्तीपासून/औषधांपासून पळवाट मिळते व शरीरात अँटीबॉडीचा प्रभाव कमी किंवा नाहीसा होतो. त्यामुळे लसीकरणाचा प्रभाव कमी होतो.
ओमिक्रॉनची रुग्णसंख्या आफ्रिकेत झपाट्याने वाढलेली असल्याने या व्हायरसला व्हिओसी (चिंताजनक उप-प्रकार)चा दर्जा दिलेला आहे.

अशा स्थितीत ओमिक्रॉनचा भारतातील प्रवेश रोखण्यासाठी किंवा प्रवेश झाला असल्यास प्रसार थांबवण्यासाठी तातडीने हालचाल सुरू करावी. जे नियम सांगितले आहे तदनुसार आपण वर्तन बदलणे आवश्यक आहे.

आपण जबाबदार समाज म्हणून…..

 • प्रत्येक कोविड-सदृश लक्षणे .. कोविड नसेल.. असा विचार करण्याऐवजी पटकन स्वॅब तपासणी करून कोविड नाही याची खात्री करणे (लक्षणे सुरू झाल्यावर दोन-तीन दिवस थांबायची गरज नाही)
 • आर्‌टीपीसीआर् तपासणी बंधनकारक
 • लक्षणे असताना कामावर/शाळा-कॉलेजमध्ये/समारंभामध्ये- गर्दीमध्ये जाणे पूर्ण टाळावे.
 • प्रत्येक कोविड बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींनी १४ दिवस इतरांपासून अंतर राखणे व आवश्यकतेनुसार तपासणी करणे.
 • प्रत्येक कोविड बाधित रुग्णांनी विलगीकरण पाळणे व संसर्ग पुढे जाणार नाही याची काळजी घेणे.
 • कोविड प्रतिबंध नियम प्रत्येकाने पाळणे.
  एक व्यक्ती म्हणून….
 • डबल मास्क किंवा कॉटनचा मास्क किंवा छ९५ मास्क वापरणे
 • घराबाहेर असताना मास्क न काढणे
 • विशेषतः इतरांसोबत असताना मास्क अजिबात न काढणे
 • लसीच्या दोन्ही मात्रा अवश्य घेणे
 • लसीकरण मे महिन्यापूर्वी झालेले असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
 • लसीकरण पूर्ण झालेल्यांमध्ये/ लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये सर्दीसारखी जरी लक्षणे असली तरी त्यामुळे संसर्ग पुढे जाऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी.
 • घरात साबणाने व बाहेर जाताना सॅनिटायझर ठेवणे. तसेच हात चेहर्‍यापासून दूर ठेवणे.
 • गर्दी/समारंभ/बंदिस्त जागा शक्यतो टाळणे.
 • कोविड झाला तर तत्पूर्वी आठवड्याभरातील संपर्कातील व्यक्तींना कल्पना देणे व १४ दिवस लक्ष ठेवण्यास सांगणे.
 • मास्क योग्य प्रकारे वापरणे
 • दुसरे लोक नियम पाळत नाही म्हणून आपण नियमांचे उल्लंघन करू नये.

प्रत्येक व्हेरियन्ट म्हणजेच उप-प्रकारापासून सुरक्षित राहता येते. सुरक्षा प्रतिबंधक उपायांची कास सोडू नका. सर्वांनी आज, आत्ता, या क्षणापासून नियम पुन्हा व्यवस्थित पाळा व स्वतःची, कुटुंबाची व समाजाची सुरक्षा वाढवा. ओमिक्रॉन हा चिंताजनक उप-प्रकार असला तरी योग्य काळजी घेतल्यास आपण याही व्हायरसचा सामना उत्तमरीत्या करू शकतो.