ओमान किनाऱ्यावर भारतीय जहाजावर हल्ला

0
15

11 पैकी 10 भारतीयांना वाचवले, 1 बेपत्ता

होर्मुझ सामुद्रधुनी बंद, इराणचा इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणवर अमेरिकेने रात्रभर हल्ले केले. या हल्ल्यांना इराणकडून उत्तर देण्यात आले. इराणने आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले केले. या दरम्यान ओमानच्या किनारपट्टीजवळ जीएफएस गॅलेक्सी या भारताच्या व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याबाबतचे निवेदन जारी केले. या जहाजावर 11 भारतीय नागरिक होते. हल्ला झाल्यानंतर त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले तर एकजण बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमान किनारपट्टीजवळ जीएफएस गॅलेक्सी जहाजाला निशाणा बनवण्यात आले. बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाचा शोध सुरू आहे.

संकटाच्या काळात मदत केल्याने ओमानच्या अधिकाऱ्यांचे धन्यवादही भारताकडून मानण्यात आले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. यासोबतच चिंताही व्यक्त केली.

भारताकडून चिंता व्यक्त
व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले. भारताने कडक भूमिका घेत म्हटले की, व्यापारी जहाजांवर आणि नागरिकांवर हल्ले करणे चुकीचे आहे. या घटना ताबडतोब बंद व्हायला हव्यात असे म्हटले आहे.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर आक्रमक भूमिका घेत आखाती देशात हल्ले केले. इराणने होर्मुझ खाडीत एका जहाजावर हल्ल केला त्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. आता दोन्ही देशातील चर्चा थांबल्या आहेत.

इराणचा अमेरिकेच्या 6 देशांतील
लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर, इराणने मध्य पूर्व भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली आहे. रविवारी इराणने जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ओमान या 6 देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले.
तत्पूर्वी, अमेरिकेने इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले होते. अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’नुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे बॉम्बहल्ले करण्यात आले होते. त्या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली, त्याचे इंजिन निकामी झाले आणि जहाजावरील एक कर्मचारी बेपत्ता झाला.
त्यानंतर, इराणने जॉर्डनचा ‘प्रिन्स हसन एअर बेस’, कुवेतमधील अमेरिकेची ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली व रडार केंद्रे आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी दळणवळण केंद्र यांना लक्ष्य केले; तसेच कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेनेही क्षेपणास्त्रे व ड्रोन डागले.

होर्मुझ खाडी बंद,
इराणने दिला इशारा

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट मोठी घोषणा करत होर्मुझ खाडी बंद करत असल्याचे जाहीर करण्यात आले. इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याची घोषणा केली असून, पुढील कारवाईचा इशाराही दिला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रझाई यांनी म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी इराणसाठी डझनभर अणुबॉम्बपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

रझाई म्हणाले, इराण कोणत्याही परिस्थितीत होर्मुझचे रक्षण करेल. होर्मुझ खाडी बंद झाल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. भारतात एलपीजी गॅस होर्मुझ खाडीतूनच दाखल होतो. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप आणि लेबनॉन, गाझामध्ये इस्त्रायलच्या लष्करी कारवाया करून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर अमेरिकेनेही इराणवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगातील बहुतांश देशांसाठी कच्च्या तेलाच्या खरेदी-विक्रीनंतर होर्मुजची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील 20 टक्के कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने केला जातो. पण हाच मार्ग पुन्हा बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जगातील बहुतांश देशात तेल, एलपीजी-एलएनजीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. अनेक देशांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील. अमेरिका-इराणच्या तणावाचा परिणाम जगावर होत आहे.

होर्मुझचे रक्षण करण्यासाठी
सज्ज ः अमेरिकेचा दावा

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी हा एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग असून कायद्यानुसार त्यातून जाणाऱ्या सर्व जहाजांसाठी तो खुला आहे. सेंटकॉमने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, या महत्त्वपूर्ण सागरी मार्गातून जहाजांचा मार्ग विनाअडथळा सुरू राहील हे सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकी सैन्य तैनात असून पूर्णपणे सज्ज आहे.
अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण नाही आणि त्यातून जहाजांची वाहतूक सुरूच आहे. इराण जहाजांना धमकावत आहे, त्यांचा छळ करत आहे आणि त्यांच्याविरुद्ध मनमानी घोषणा करत असल्याचा आरोप केला आहे.