१९ जातींना मिळणार लाभ
चालू आर्थिक वर्ष अखेरपर्यंत इतर मागास वर्गियांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्यासंबंधीची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन समाजकल्याण मंत्री महादेव नाईक यांनी काल विधानसभेत समाजकल्याण खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना दिले. वरील मागणी पूर्ण केल्यानंतर राज्यातील १९ जातींना त्याचा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली १२ हजार नवीन अर्जं मंजूर केले असून त्यांना लवकरच धनादेश वितरीत केले जाईल. सध्या १ लाख १६ हजार लाभार्थी असल्याची माहिती नाईक यांनी दिली. गोव्यात सध्या सुमारे ३२ हजार विधवा महिलांना या योजनेचा लाभ होत आहे. विधवांचे हे वाढतेप्रमाण क्लेशदायक असल्याचे ते म्हणाले. उत्तर गोव्यातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले असता ११ हजार २९१ जणांचे आर्थिक सहाय्य रद्द करावे लागले त्यात सरकारी नोकरांचाही समावेश आहे. सरकारी नोकरांना मिळत असलेले वरील आर्थिक सहाय्य रद्द केल्याने १२ लाख २२ हजार रुपये वसूल केले आहे. तर मृतांच्या नावांवर असलेले वेतन रद्द केल्याने सुमारे ५ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली अर्जांची छाननी योग्य पध्दतीने होत आहे. दक्षिण गोव्यातही किमान २० हजार ङ्गबोगसफ लाभार्थी सापडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसुचित जातीतील लोकांना घरे बांधून देण्याच्या योजनेसाठी सरकारने केंद्राकडे ५० कोटींची मागणी केली आहे. परंतु अद्याप केंद्राकडून प्रतिसाद मिळालेला नाही. गरज भासल्यास आपण त्यासाठी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाचाही जमातीत समावेश व्हावा म्हणून सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

