ऑस्ट्रेलियाचा विश्‍वविजयी ‘पंच’

0
231
विश्व चषक पटकाविल्यानंतर जल्लोष करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू.

विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून दमदार विजय साजरा करत तब्बल आठ वर्षांनी पाचव्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले. मेलबर्न स्टेडियमच्या बालेकिल्ल्यात कांगारूंनी किवींचे १८४ धावांचे माफक आव्हान सहजरीत्या गाठल्याने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंडचे पहिल्या-वहिल्या विश्‍वविजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. कांगारूंनी याआधी १९८७, १९९९, २००३ आणि २००७ साली वर्ल्डकप जिंकला होता. मायकल क्लार्क हा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा कर्णधार ठरला. मेलबर्नवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांनी विजयाचा पाया घातला. स्टार्क, जॉन्सन, फॉकनर आणि मॅक्सवेल यांच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव ४५ षटकांत केवळ १८३ धावांत गुंडाळला गेला.
मायकल क्लार्क व स्टीव्हन स्मिथ यांनी तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरचा एक दिवसीय सामना खेळणार्‍या कर्णधार क्लार्कने सर्वाधिक ७४ धावा केल्या. त्याला उत्तम साथ देत स्टिव्हन स्मिथनेही नाबाद अर्धशतक झळकावले.
या सामन्यात तीन बळी घेणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरला सामनावीर, तर संपूर्ण मालिकेत २२ विकेट घेणार्‍या मिचेल स्टार्कला मालिकावीराचा किताब देण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या दोघांचा सन्मान करण्यात आला.
ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा जगज्जेते
अंतिम सामन्यात न्यूझीलँडवर ७ गडी राखून मात
जेम्स फॉल्कनर व मिचेल जॉन्सन यांच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मायकल क्लार्कने स्टीव्ह स्मिथच्या साथीत तिसर्‍या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अविभक्त भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडचा ७ गडी १०१ चेंडू बाकी राखत सहज पराभव करीत पाचव्यांदा विश्व चषक जिंकण्याचा मान मिळविला. पहिल्यांदाच विश्व चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलँडचे जेतेपदाचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा या विश्व चषकात केवळ एका सामन्यात पराभव झाला, तर एक सामना टाय झाला. घरच्या मैदानावर विश्व चषक जिंकणारा भारतानंतर ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चार विश्व चषक स्पर्धा जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा हा पाचवा विश्व चषक आहे. ऑस्ट्रेलिया १९८७, १९९९, २००३, २००७ आणि आता पाचव्यांदा २०१५ चा वर्ल्डकप जिंकत विश्वजेता ठरला. मायकल क्लार्क हा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा कर्णधार ठरला.
या सामन्यात तीन विकेट पटकावणार्‍या ऑस्ट्रेलिच्या जेम्स फॉल्कनर सामनावीर, तर संपूर्ण मालिकेत २२ विकेट घेणार्‍या मिचेल स्टार्कला मालिकावीराचा किताब देण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या दोघांचा सन्मान करण्यात आला.
न्यूझीलँडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य ३३.१ षट्‌कांत केवळ ३ गडी गमावत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियची सुरुवात खराब झाली. आरॉन फिन्च दुसर्‍याच षट्‌कात खाते खोलण्यापूर्वीच ट्रेंट बाउल्टच्या गोलंदाजीवर झेल बाद होऊन परतला. बाउल्टनेच त्याला टिपले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्टिव्ह स्मिथच्या साथीत ६१ धावा जोडल्या. वॉर्नर (४५) मॅट हेन्रीला उचलून मारण्याच्या प्रयत्नात ग्रँट इलियॉटकडे झेल देऊन बाद झाला. परंतु त्यानंतर आपला शेवटचा विश्व चषक खेळणार्‍या मायकल क्लार्कने स्मिथच्या साथीत ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. विजयासाठी केवळ १० धावांची आवश्यकता असताना क्लार्क ७२ चेंडूत १० चौकार आणि १ षट्‌काराच्या साहाय्याने ७४ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करून मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. ३४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचून स्टिव्हन स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून न्यूझीलँडचा कर्णधार ब्रँडन मॅकलमने प्रथम फलंदाजी करण्याचा निणर्य घेतला. परंतु त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलँडचा डाव ४५ षट्‌कांत केवळ १८३ धावांवर संपुष्टात आला. ग्रँट एलियट (८३) आणि रॉस टेलर (४०) वगळता इतर एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच कांगारूंनी किवींना तीन जोरदार हादरे दिले. दु्रतगती गोलंदाज मिचेल स्टार्कने न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅकलमला खाते खोलण्यापूर्वीच त्रिफळाचित करीत परतीची वाटत दाखविली. दुसरा सलामीवीर मार्टिन गुप्टिल (१५) ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर त्रिळाचित झाला. तर केन विलियम्सला (१२) मिचेल जॉन्सनने आपल्याच गोलंदाजीवर टिपले. परंतु त्यानंतर रॉस टेलर आणि उपांत्य फेरीतील न्यूझीलँडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ग्रँट इलियॉटने संघाचा डाव सारवत चौथ्या विकेटसाठी संयमी १११ धावांची भागिदारी करीत संघाला ३५व्या षट्‌कापर्यंत दिडशतकापर्यंत नेले. न्यूझीलंडचा धावफलक हलता राहिल या दृष्टीने प्रयत्न करत असताना ३६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलर बाद झाला. रॉस टेलरने ४० धावा केल्या. पाठोपाठ अष्टपैलू विस्फोटक फलंदाज कोरे अँडरसन खाते खोलण्यापूर्वीच माघारी परतला. ल्यूक रॉंचीही जास्त काही करू शकला नाही व तोही एकाही धावेची भर न घालता तंबूत परतला. डॅनियल व्हिटोरिने ९ धावा जोडल्या. तर मैदानात चांगला जम बसवलेला ग्रँट एलियट देखील ७२ चेंडूत ७ चौकार व १ षट्‌काराच्या साहाय्याने ८३ धावा ठोकून माघारी परतला. एलियट बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडचा १८३ धावांवर संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉल्कनरने ३६ धावांत ३, मिचेल जॉन्सनने ३० धावांत ३, मिचेल स्टार्कने २० धावांत २ तर ग्लेन मॅक्सवेलने १ गडी बाद केला.
धावफलक,
न्यूझीलँड ः मार्टीन गुप्टिल त्रिफळाचीत ग्लेन जेम्स मॅक्सवेल १५, ब्रॅन्डन मॅकलम त्रिफळाचीत मिचेल स्टार्क ०, केन विल्यमसन झेल मिचेल जॉन्सन गो. मिचेल जॉन्सन १२, रॉस टेलर झेल ब्रॅड हॅडिन गो. जेम्स पीटर फॉल्कनर ४०, ग्रँट इलियॉट झेल ब्रॅड हॅडिन गो. जेम्स पीटर फॉल्कनर ८३, कॉरी अँडरसन त्रिफळाचीत जेम्स पीटर फॉल्कनर ०, ल्यूक रॉंची झेल मायकल क्लार्क गो. मिचेल स्टार्क ०, डॅनिअल व्हिटोरी त्रिफळाचीत मिचेल जॉन्सन ९, टीम साऊथी धावचीत ग्लेन जेम्स मॅक्सवेल ११, मॅट हेन्री झेल मिचेल स्टार्क गो. मिचेल जॉन्सन ०, ट्रेंट बाउल्ट नाबाद ०.
अवांतर ः १३. एकूण ४५ षट्‌कांत सर्वबाद १८३ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/१ (ब्रॅन्डन मॅकलम, ०.५), २/३३ (मार्टीन गुप्टिल, ११.२), ३/३९ (केन विल्यमसन, १२.२), ४/१५० (रॉस टेलर, ३५.१), ५/१५० (कॉरी अँडरसन, ३५.३), ६/१५१(ल्यूक रॉंची, ३६.२), ७/१६७ (डॅनिअल व्हिटोरी, ४१.०), ८/१७१ (ग्रँट इलियॉट, ४१.५), ९/१८२ (मॅट हेन्री, ४४.५), १०/१८३ (टीम साऊथी, ४५.०)
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ८/०/२०/२, जोस हॅझलहूड ८/२/३०/०, मिचेल जॉन्सन ९/०/३०/३, ग्लेन जेम्स मॅक्सवेल ७/०/३७/१, जेम्स पीटर फॉल्कनर ९/१/३६/४, शेन वॉटसन ४/०/२३/०.
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झेल ग्रँट इलियॉट गो. मॅट हेन्री ४५, आरॉन फिन्च झेल व गो. ट्रेंट बाउल्ट ०, स्टिव्ह स्मिथ नाबाद, मायकल क्लार्क त्रिफळाचीत मॅट हॅन्री ७४, शेन वॉटसन नाबाद २.
अवांतर ः ९. एकूण ३३.१ षट्‌कांत ३ बाद १८६ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/२ (आरॉन फिन्च, १.४), २/६३ (डेव्हिड वॉर्नर, १२.२), ३/१७५ (मायकल क्लार्क, ३१.१).
गोलंदाजी ः टीम साऊथी ८/०/६५/०, ट्रेंट बाउल्ट १०/०/४०/१, डॅनिअल व्हिटोरी ५/०/२५/०, मॅट हेन्री ९.१/०/४६/२, कॉरी अँडरसन १/०/७/०.
विजय फिल ह्युजेसला समर्पित : क्लार्क
आम्ही यंदाचा विश्वचषक पंधराऐवजी सोळा खेळाडूंसह खेळलो असून हा विजय फिल ह्युजेसला समर्पित करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने चषक उंचावल्यानंतर दिली. एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान उसळी चेंडू आदळल्याने ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी आणि तरूण फलंदाज फिलिप ह्युजेसचा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुर्देवी मृत्यू झाला होता. माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नने दिलेली २३ क्रमांकाची जर्सी परिधान केल्याचा अभिमान वाटत असल्याचेही तो पुढे म्हणाला. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी कसोटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचीही माहिती क्लार्कने यावेळी दिली.
अन् श्रीनिवासन प्रदान केला विजेत्या ऑस्ट्रेलियाला चषक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद मुस्तफा कमाल यांच्याकडे असूनही काल रविवारी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चषक प्रदान केला. विजेत्या संघाला आयसीसी अध्यक्षच्या हस्ते चषक प्रदान करण्याची प्रथा आहे. परंतु, टीम इंडियाकडून बांगलादेशचा पराभव झाल्यावर मुस्तफा कमाल यांनी वादग्रस्त विधाने केली होती. आयसीसीच्या अध्यक्षांकडून नियमांचे उल्लंघन झाले असून त्यांना विश्वचषक प्रदान करण्याचा मान दिला जाऊ नये, असा दावा श्रीनिवासन यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर विजेत्या संघाला चषक कोण्याच्या हस्ते दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर खुद्द श्रीनिवासन यांच्या हस्तेच ऑस्ट्रेलियाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.