ऑपरेशन सिंदूर जगातील कुठल्याही नेत्याने थांबवण्यास सांगितले नव्हते

0
21

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युद्धबंदीविषयीच्या विरोधकांच्या आरोपांवर लोकसभेत प्रत्युत्तर

लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरून सुरू असलेल्या चर्चेमध्ये भारताने अचानक मान्य केलेल्या युद्धबंदीचा निर्णय केंद्रस्थानी राहिला होता. तसेच भारताने युद्धबंदीचा निर्णय हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून घेतला का? असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवेळी उत्तरादाखल दिली. जगातील कुठल्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितले नव्हते, हे मी जबाबदारीने सांगतोय, असे उत्तर नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी हे उत्तर दिले. तसेच सैन्य दलांवर विश्वास ठेवायचा नाही हे काँग्रेसचे जुने धोरण आहे, अशी टीकाही मोदींनी केली.

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवारपासून चर्चेला सुरुवात झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काल देखील आरोप-प्रत्यारोप झाले. कालच्या चर्चेदरम्यान सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवले नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगावे, असे आव्हान राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलायला उभे राहिले. त्यावेळी, ‘जगातल्या कुठल्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा, असे आपल्याला सांगितले नव्हते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मोदींच्या उत्तरावेळी विरोधकांनी मध्येच घोषणाबाजी करत, ‘तसे असेल तर तुम्ही ट्रम्प खोटे बोलत आहे असे सांगा’ अशी मागणी केली.

22 मिनिटांत बदला घेतला

पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा चोख बदला आम्ही घेतला. 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटांत घेतला आणि दहशतवाद्यांना गाडले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या ‘आकां’ची आजही झोप उडालेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जेडी वान्स यांचा फोन; पण…

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, 9 मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माझी तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे मला त्यांचा फोन उचलता आला नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की, पाकिस्तानने अशी आगळीक केली तर ती त्यांना खूप महागात पडेल. तर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीचे उत्तर हे गोळ्याने दिले जाईल, असे मी त्यांना सांगितले होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही

मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळीक केली, तर त्यांना चोख प्रत्युत्तर नक्कीच मिळेल, असेही मोदी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचेही पुरावे काँग्रेसने मागितले होते आपल्या भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा काँग्रेसने पुरावे मागितले होते. आपल्या वायुदलाने एअर स्ट्राईक केला, तेव्हाही त्यांनी पुरावे मागितले. आता ऑपरेशन सिंदूरलाही नावे ठेवणारे हेच लोक आहेत. ऑपरेशन सिंदूर झाले, हेच आधी मान्य करायला तयार नव्हते. आता विचारत आहेत ऑपरेशन सिंदूर का थांबवले? असा टोलाही पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला.

भारताला जगभरातून समर्थन, पण काँग्रेसकडून समर्थन मिळाले नाही
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, तर भारताला बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळाले; पण माझ्या देशातील शूरवीरांना काँग्रेसचे समर्थन मिळाले नाही हे दुर्दैव, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

काँग्रेसचा भारतीय सैन्यावर विश्वास नाही
पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली, असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केले काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होते. काँग्रेसला ना भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, ना भारतीय सैन्यावर, अशा शब्दांत पंतप्रधानांनी फटकारले.

पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली
9 मेच्या मध्यरात्री ते 10 मेच्या पहाटेपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक तळांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने असा हल्ला केला की पाकिस्तानने त्याचा विचारही केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर आले. त्यावेळी पाकिस्तानचा पहिला फोन आला. डीजीएमओला पाकिस्तानकडून फोन आला आणि भारताला हल्ले थांबवण्याची विनंती केली.