जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्करी प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सहा लष्करी जवानांची नावे भारत सरकारने प्रथमच जाहीर केली आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 25 पर्यटक आणि एका स्थानिक घोडावाल्यासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यात शहीद झालेल्या सहा जवानांची नावे भारताने पहिल्यांदाच सार्वजनिक केली आहेत.
ऑपरेशन सिंदूरमध्चे ‘कोणतीही हानी झाली नाही’ असा दावा मोदी सरकारकडून सातत्याने केला जात होता; मात्र आता ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील 6 जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आली आहेत. ही नावे नॅशनल वॉर मेमोरियलच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या 3डी भिंतीवर 2025 च्या विभागातही त्यांची नावे कोरण्यात आली आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे. रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 च्या पहाटेच्या सुमारास दहशतवादी हल्ल्याला थेट प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त झाले होते. तीन दिवस झालेल्या चकमकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी शस्त्रसंधी झाली होती.
शहीद झालेले 6 जवान कोण?
- सुभेदार मेजर पवन कुमार
(मुख्यालय, 10 इन्फंट्री ब्रिगेड) - रायफलमन सुनील कुमार
(4 थी बटालियन जम्मू आणि काश्मीर
लाइट इन्फंट्री रेजिमेंट) - लान्स नाईक दिनेश कुमार
(5 वी फील्ड रेजिमेंट) - अग्निवीर मूड मुरली नायक
(851 वी लाइट रेजिमेंट) - हवालदार सुनील कुमार सिंग
(237 वी फील्ड वर्कशॉप) - सार्जंट सुरेंद्र कुमार
(39 विंग, भारतीय हवाई दल)

