ऑनलाइन गंडा घालण्यासाठी नवी शक्कल

0
10

>> भामट्यांनी वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना पाठवले संदेश

सायबर गुन्हेगारांनी लोकांना गंडा घालण्यासाठी नवी युक्ती लढवत, वीज बिले न भरल्यास वीज जोडणी तोडण्यात येणार असल्याचे संदेश वीज ग्राहकांना पाठवल्याचा प्रकार काल उघडकीस आला. या भामट्यांनी काही वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवले असून, त्यात ऑनलाइन वीज बिल भरणा करण्यासाठी लिंक देखील पाठवली आहे. वीज खात्याने मात्र असे कोणतेही संदेश पाठवले नसल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे.

वीज खात्याने काल यासंबंधी खुलासा करताना आम्ही ग्राहकांना वीज बिले ऑनलाइन भरण्यासाठी संदेश पाठवलेले नसून, हे लोकांना ऑनलाइन गंडा घालणार्‍या सायबर गुन्हेगारांचे काम असावे, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी पाठवलेल्या लिंकचा वापर करून वीज बिलासाठीचे पैसे भरू नये. तसेच त्यांच्याशी कोणताही आर्थिक अथवा अन्य प्रकारचा व्यवहार करू नये, अशी सूचनाही केली आहे.

अज्ञात लोकांनी पाठवलेल्या या संदेशांकडे वीज ग्राहकांनी दुर्लक्ष करावे, अशी सूचना करताना वीज खात्याने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत, त्यांच्या जोडण्या तात्काळ तोडण्यासंबंधी वीज खाते कधीही संदेश पाठवणार नाही. तसेच व्हॉट्‌सऍप संदेशही पाठवणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
यासंबंधी अधिक काही जाणून घ्यावयाचे असल्यास वीज खात्याच्या १९१२ या हेल्पलाईन किंवा ०८३२-२४९०८०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे वीज खात्याने कळवले आहे.