राज्यातील अनुसूचित जमातींना (एसटी) पुढील विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हे प्रयत्नरत असून, या पार्श्वभूमीवर रमेश तवडकर यांच्या नेतृत्त्वाखालील एसटी नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन वरील प्रकरणी त्यांच्याशी चर्चा केली आणि मागणी धसास लावण्याची सूचना त्यांना केली. यावेळी रमेश तवडकर यांच्याबरोबर सभापती गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे व आमदार आंतोन वाझ हे उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने सदर प्रश्नी मुख्यमंत्र्यांना परत एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिल्लीत जाऊन चर्चा करण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सदर प्रश्नी अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, राज्यातील अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना यश येणार असून, अनुसूचित जमातींनी संयम बाळगावा, असे आवाहन काल रमेश तवडकर यांनी केले. 2027 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील आदिवासी बांधवांना राजकीय आरक्षण मिळेल, असा विश्वास तवडकर यांनी व्यक्त केला. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

