आमदार गोविंद गावडे यांचे प्रतिपादन; म्हार्दोळ येथील मेळाव्याला समाजबांधवांची मोठ्या संख्येने गर्दी
अनुसूचित जमातींच्या (एसटी) राजकीय आरक्षणाची आठवण सरकारला करून देण्यासाठी हा महामेळावा आयोजित केला आहे. कारण राजकीय आरक्षण प्राप्त होणे काळाची गरज आहे. एसटी समाजाचा अनेकांनी वापर करून राजकीय पोळी भाजून घेतली. आता राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवानी एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार गोविंद गावडे यांनी काल केले.
म्हार्दोळ येथील युनायटेड स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर गुरुवारी उटातर्फे महामेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आंतोन वाझ, माजी आमदार वासू मेंग गावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, गोविंद शिरोडकर, दुर्गादास गावडे, विश्वास गावडे व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोव्यातील ओबीसी आणी एससी या समाजबांधवांना सरकारी कार्यालयांत आरक्षण फक्त उटामुळे प्राप्त झाले, हे कुणीच विसरू नये. एसटी समाजाला राजकीय आरक्षण अत्यंत गरज आहे. एसटी समाज सरकारकडे भीक मागत नाही. समाज बांधवाचा हक्क द्या, हीच आमची मागणी असल्याचे गोविंद गावडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी ‘त्यांचा’ सल्ला घेऊ नये
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्याभोवती फिरणाऱ्यांचा सल्ला घेऊ नये. कारण भविष्यात एसटी आमदारांशिवाय सरकार घडू शकणार नाही. निकटवर्तीयांचा सल्ला न घेताच एसटी आरक्षणासाठी प्रयत्न केल्याबद्धल आपण मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात खुर्ची घेऊन बसलेल्यांना त्यांची जागा दाखविण्यास समाजबांधव सक्षम असल्याचेही आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
2027 मध्ये आरक्षण
मिळायला हवे : वेळीप
राजकीय आरक्षण 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. एसटींसाठी लागू झालेल्या योजना हे समाजबांधवांच्या कष्टाचे फळ आहे. ह्या महामेळाव्यात समाजबांधवांनी सर्व मतभेद विसरून एकत्रित येत मोठी गर्दी केली. भविष्यात सुद्धा एकत्रित राहून मागण्यांसाठी लढा देणे आवश्यक आहे. येणाऱ्या विधानसभेत समाजबांधवांचे 4 आमदार जाणार आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
उटा संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट
येत्या महिनाभरात ‘उटा’चे पदाधिकारी राष्ट्रपतींची भेट घेऊन गोव्यातील एसटी आरक्षणाचा विषय त्यांना समजावून सांगणार आहेत. कारण गेली 23 वर्षे समाजबांधवांची मागणी प्रलंबित असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.

