एसओपीसंबंधी विरोधकांनी अज्ञान प्रकट करू नये ः आरोग्यमंत्री राणे

0
159

परराज्यातून येणार्‍या प्रवाशांसाठीच्या ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या (एसओपी) प्रश्‍नावरून राज्य सरकारवर टीका व आरोप करणार्‍या विरोधकांचा काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ‘एसओपी’ हे तज्ज्ञ लोक तयार करीत असतात व आम्हीही या ‘एनओपी’संबंधी वेळोवेळी सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेत असतो. त्यामुळे एसओपीसंबंधी विरोधकांनी वायफळ बडबड करून आपले अज्ञान प्रकट करू नये, असा सल्ला राणे यांनी विरोधकांना दिला.
यासंबंधी राणे म्हणाले की, एसओपीत वेळच्या वेळी बदल केले जातात. ज्या वेळी विदेशात नोकर्‍या करणारे दर्यावर्दी गोव्यात परतले त्यावेळी एसओपी खूपच कडक होते.

परिणामी या दर्यावर्दींना जास्त दिवस विलगीकरणात रहावे लागले. त्यामुळे दर्यावर्दींसाठी सरकारने वेगळे व कडक एसओपी तयार केल्याचा विरोधकांनी केलेला आरोप हा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्यात वेळच्या वेळी गरजेनुसार एसओपीमध्ये बदल केले जात असून गोवा त्याला अपवाद नसल्याचे ते म्हणाले.

सर्व आमदारांचे सहकार्य हवे
कोरोना महामारीच्या या संकटकाळी गोवा सरकारला चाळीसही आमदारांकडून सहकार्य हवे असल्याचे सांगून आमदारांनी सरकार यशस्वीपणे हा लढा देत असताना सरकारसमोर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

फूट पाडण्यासाठी अफवा
काही विरोधी आमदार विनाकारण खालच्या स्तरावर येऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर नको ती टीका करू लागले असल्याचे सांगून त्यांनी खेद व्यक्त केला. मुख्यमंत्री व आपल्यामध्ये मतभेद असल्याच्या अफवाही काही लोक पिकवू लागलेले असून आमच्यात फूट पाडण्यासाठीच हे केले जात असल्याचे ते म्हणाले.

गोमंतकीयांसाठी वेगळे एसओपी
तयार करावे ः विजय सरदेसाई
गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई तसेच त्यांचे अन्य दोन आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर व कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांची भेट घेतली व राज्यात परतणार्‍या गोमंतकीयांसाठी वेगळी व विशेष अशी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ तयार केली जावी, अशी मागणी करणारे एक निवेदन त्यांना सादर केले.

वेगवेगळ्या विदेशी जहाजांवर काम करणार्‍या गोमंतकीय दर्यावर्दींकडून विलगीकरणासाठीचे शुल्क घेणे बंद करावे, अशी मागणी वरील निवेदनातून करण्यात आली आहे, असे सरदेसाई यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले.