राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (एसआयआर) कालपासून प्रारंभ करण्यात आला. उत्तर गोव्यातील विविध मतदारसंघांत पहिल्याच दिवशी सुमारे 30 हजार मतदार पडताळणी अर्जांचे वितरण मतदारांना करण्यात आले, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी काल दिली.
उत्तर गोवा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील बीएलओंना या मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आले असून, छापील अर्ज बीएलओंकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. बीएलओ प्रत्येक मतदारांना छापील अर्ज देणार असून, भरलेले अर्ज स्वीकारणार आहेत, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. मतदारयादीत नावे असलेल्या सर्व मतदारांनी छापील अर्ज भरून बीएलओंकडे सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, दक्षिण गोव्यात सुध्दा एसआयआरसाठी बीएलओंकडून मतदारांना छापील अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.