राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनच्या (एसआयआर) कामाला गैरहजर राहिल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोलवाळ पोलिसांनी कोलवाळ येथील 200 केव्ही वीज केंद्रात कामावर असलेल्या एका साहाय्यक अभियंत्याला बुधवारी रात्री ताब्यात घेतल्याने तो वादाचा विषय बनला. अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या वीज खात्याच्या साहाय्यक अभियंत्याला ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा गोवा प्रदेश काँग्रेस, आम आदमी पार्टी यांनी निषेध केला. काँग्रेस पक्षाने या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कारवाईबाबत संताप व्यक्त केला.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर साहाय्यक अभियंत्याची एसआयआर मोहिमेसाठी नियुक्ती केली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला एसआयआरच्या कामावर येण्याची सूचना केली होती. तथापि, वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने कोलवाळ येथील वीज केंद्रात साहाय्यक अभियंत्याची कमतरता असल्याने त्या साहाय्यक अभियंत्याला एसआयआरच्या कामावर न जाण्याची सूचना केली. त्याबाबतची माहिती संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. तथापि, उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या साहाय्यक अभियंत्यावर कामावर येण्याचा तगादा लावला. तो कामावर येत नसल्याने कोलवाळ पोलिसांना त्याला आपल्यासमोर हजर करण्याचा आदेश दिला.
कारवाई चुकीची : अमित पाटकर
राज्यातील एसआयआरसाठी वीज खात्यातील साहाय्यक अभियंता या राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या अधिकाऱ्यांवर उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा : आप
अत्यावश्यक सेवेमध्ये काम करताना पोलिसांकरवी एखाद्याला जबरदस्तीने बाहेर नेणे चुकीचे आहे. या प्रकरणात त्या उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासमोर स्पष्टीकरण केले आहे. या प्रकारानंतर आता कोणत्याही खात्यातील एखाद्या अधिकाऱ्याला बीएलओ सुपरवायजरचे काम करणे शक्य होत नसेल, तर त्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. वीज केंद्रातून ज्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याबाबत आदेश कलम 32 (बी) अंतर्गत देण्यात आला होता. संबंधित उपजिल्हाधिकारी पोलिसांच्या मदतीने त्याला घेऊन जाणार होते व नंतर त्याच ठिकाणी आणून पोहोचवणार होते. त्यांच्या अटकेसाठी आदेश नव्हता, असेही अंकित यादव यांनी सांगितले.
साहाय्यक अभियंत्यांची कमतरता : काशिनाथ शेट्ये
कोलवाळ येथील 200 केव्ह. वीज केंद्र हे उत्तर गोव्यातील प्रमुख वीज केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी कामासाठी साहाय्यक अभियंत्याची नियुक्ती केली जाते. कोलवाळ वीज केंद्रात 5 साहाय्यक अभियंते होते. त्यातील 2 जणांना बढती मिळाली आहे. सध्या त्या ठिकाणी केवळ 3 साहाय्यक अभियंते कार्यरत आहेत. या वीज केंद्रात साहाय्यक अभियंत्यांना कामासाठी आळीपाळीने नियुक्त केले जातात. सध्या या ठिकाणी साहाय्यक अभियंत्यांची कमतरता असल्याने निवडणुकीच्या कामात साहाय्यक अभियंता सहभागी होऊ शकत नाही, असे संबंधितांना कळविण्यात आले आहे. या प्रकाराबाबत त्या उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात तक्रार केली जाणार आहे. तसेच, मानवअधिकार आयोगाकडे सुध्दा दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

