एसआयआरमध्ये अनियमिततानाही : सीईओ संजय गोयल

0
6

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) संजय गोयल यांनी एसआयआरमधील अनियमिततेचा आरोप फेटाळून लावला. ही पुनरावलोकन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली होती. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी झालेले मतदार व त्रुटी असलेली प्रकरणे यांची यादी मतदान केंद्रांवर प्रदर्शित करण्यात आली होती आणि अंतिम याद्या राजकीय पक्षांना देण्यात आल्या होत्या, असेही गोयल यांनी सांगितले. या प्रक्रियेसंदर्भात प्राप्त झालेली काही अपिले निकाली काढण्यात आली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

अंतिम मतदा यादीतून वगळण्यात आलेल्या 97 मतदारांबाबत माहिती देताना संजय गोयल म्हणाले की, बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाहणी केल्यानंतर आणि इच्छुक मतदारांना अर्ज भरण्यास मदत केल्यानंतर त्यातील अनेकांची नावे नंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आली. ज्यांची नावे अजूनही यादीत नाहीत, ते ‘फॉर्म 6′ द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
त्या 97 नावांच्या या प्रकरणासाठी कोणाला जबाबदार धरले जाईल, असे विचारले असता गोयल म्हणाले की, कोणतीही चूक झालेली नाही. तसेच, वगळलेली नावे समाविष्ट करण्यासाठी अपील आणि ‘फॉर्म 6′ च्या प्रक्रिया उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पात्र आणि इच्छुक व्यक्तींचा मतदानाचा अधिकार कायमचा हिरावून घेतला गेलेला नाही आणि आगामी निवडणुकांपूर्वी नाव समाविष्ट करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.