काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. कार्लुस फेरेरा यांची माहिती;
मतदारांना मार्गदर्शन व आवश्यक मदत पुरवणार
एसआयआर प्रक्रियेनंतर मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी गोवा काँग्रेसने खास हेल्पलाईन सुरू केली असून, 7875833833 हा विशेष हेल्पलाईन क्रमांक आहे, अशी माहिती काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. कार्लुस फेरेरा यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली. मतदारयादीतून नाव वगळले गेले असल्याची शंका असलेल्या किंवा प्रत्यक्षात नाव वगळलेल्या पात्र मतदारांना मार्गदर्शन व आवश्यक मदत या हेल्पलाईनद्वारे केली जाणार आहे. यावेळी कॉँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमित पालेकर आणि सावियो कुतिन्हो यांची उपस्थिती होती.
गोव्यातील विशेष सखोल मतदारयादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेचा गैरवापर करून भाजपविरोधी मतदारांना लक्ष्य करण्यात आले, असा आरोप आमदार फेरेरा यांनी केला.
सावियो कुतिन्हो यांनी नावेली मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार उघड केल्यानंतर संबंधित बीएलओपैकी एकाने तातडीने आपला अर्ज मागे घेतल्याचे पत्र सादर केले. असे प्रकार केवळ एखाद्या एकाच मतदारसंघापुरते मर्यादित नसून, राज्यभरातील विविध मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीने अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काही मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्याचे आदेश दिले; पण संबंधित मतदारांना पुन्हा फॉर्म-6 भरून अर्ज करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला.
राष्ट्रीय पातळीवर मतदार यादीतील कथित गैरव्यवहारांबाबत सातत्याने व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी 4 नोव्हेंबर 2025 पासून गोव्यातील एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवसापासून आम्हाला या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि हस्तक्षेप दिसून आले. आम्ही प्रत्येक गैरप्रकार उघडकीस आणला, तेव्हा आम्हाला खोट्या एफआयआरसारख्या माध्यमांतून गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे साविया कुतिन्हो यांनी सांगितले.
सांताक्रूझ मतदारसंघात एसआयआर प्रक्रियेदरम्यान सुमारे 20 टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार अचानक अस्तित्वात नसल्याचा दावा करणे अशक्य आहे. प्रत्यक्षात त्या परिसरात राहणाऱ्या आणि मतदानाचा पूर्ण अधिकार असलेल्या नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे सरकारी निवासस्थानांमध्ये वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे अजूनही मतदारयादीत कायम आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांनी तातडीने आपले नाव मतदारयादीत तपासावे आणि कोणतीही अडचण असल्यास काँग्रेस पक्षाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालेकर यांनी केले.

