एल निनो’मुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार : स्कायमेट

0
12

‘एल निनो’चा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट ह्या खासगी हवामान संस्थेने काल वर्तवला. 2026 मध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी पावसाचा अंदाज देखील स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ या हवामान स्थितीमुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

भारतातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे 70 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील 140 कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या जून आणि जुलै महिन्यात होत असल्याने मान्सूनचे वेळेवर आगमन आणि त्याचे वितरण हे कळीचे ठरते.

पावसाची टक्केवारी किती?
स्कायमेटच्या अंदाजानुसार, चार महिन्यांच्या या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या (868.6 मिमी) 94 टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

मान्सूनचे वेळापत्रक
साधारणपणे, दक्षिण-पश्चिम मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो.

‘एल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे काय?
एल निनो : पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणे, याला ‘एल निनो’ म्हणतात. याचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो आणि पाऊस कमी होतो.
ला निना : पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्याच्या स्थितीला ‘ला निना’ म्हणतात, ज्यामुळे मान्सूनला बळकटी मिळते आणि पाऊस चांगला होतो.