Home बातम्या एमपीटी रेल्वे यार्डातील कामगारांचा बंद; कारवाई

एमपीटी रेल्वे यार्डातील कामगारांचा बंद; कारवाई

0

मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या वाहतूक विभागाच्या रेल्वे यार्डातील कामगारांनी माल वाहतुकीसाठी लागणार्‍या दुहेरी इंजीनला विभागून काम करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाला विरोध करून काम बंद ठेवल्याने कारवाई म्हणून व्यवस्थापनाने शंटिंग मास्टरला निलंबित केले आहे तर अन्य एकाला मेमो दिला आहे.

उलपब्ध माहितीनुसार वाहतूक विभागाच्या व्यवस्थापकाने बुधवारी परिपत्रक (क्र. टीएम/ ६४५/२०१२/२५२९) जारी करून रेल्वे यार्डापासून ते धक्का क्र. १० पर्यंत रेल्वे माल वाहतुकीचा भार वाहू लागल्याने मालवाहतूक डबे ओढण्यासाठी एक इंजीनाऐवजी दोन इंजनांचा वापर करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेताना प्रत्येक इंजनाबरोबर दोन ऐवजी एक शंटिंग मास्टर व चार यार्ड पोर्टर ऐवजी दोन यार्ड पोर्टर वापरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते.

रेल्वे यार्डातील कामगारांची संख्या अपुरी असून गेल्या पंधरा वर्षापासूनची व्यवस्था खंडित करण्यास विरोध करून कामगारांनी सुरक्षा, कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेऊन यार्डातील एकूण ६२ कामगारांनी गुरुवारी दिवसभर काम बंद ठेवले. एम. पी. टी. व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेऊन शंटींग मास्टर लवू देसाई याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला तर अन्य एकाला मेमो दिला. कामगार नेते लॉरेन्स कार्दोझ तसेच लक्ष्मण गावडे यांनी व्यवस्थापनाच्या सदर निर्णयाचा निषेध करून निलंबन आदेश मागे घेईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे सांगितले. रेल्वेद्वारे मुरगाव बंदरातून होणार वाहतूक खंडित झाल्यामुळे याचा जबरदस्त परिणाम बंदरातील कोळसा कोक व इतर वाहतुकीवर दिसून येण्याची शक्यता आहे.