एमआरएफचा नोकरभरती मेळावा वादात

0
6

कुडाळात मेळावा आयोजित केल्याचा कंपनीकडून इन्कार

विरोधकांचा आक्षेप

फोंडा तालुक्यातील उसगाव येथील एमआरएफ टायर निर्मिती कंपनीने कुडाळ सिंधुदुर्ग येथे 12 सप्टेंबर 2025 रोजी नोकरभरती मेळाव्याचे आयोजन केल्याने नोकर भरतीच्या विषयावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी एमआरएफ या खासगी कंपनीच्या परराज्यातील नोकर भरतीला आक्षेप घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारने एमआरएफ कंपनीच्या कुडाळ सिंधुदुर्ग येथील कथित नोकर भरतीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर एमआरएफ कंपनीने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविलेल्या एका पत्रामध्ये कुडाळ सिंधुदुर्ग येथील नोकर भरतीच्या वृत्ताचा इन्कार केला असून कंपनीने फर्मागुडी येथे शुक्रवारी नोकर भरती मेळावा आयोजित केला आहे, असा दावा केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने एमआरएफ टायर कंपनीने 12 सप्टेंबर रोजी कुडाळ येथे नोकरभरती मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एमआरएफ कंपनीत 250 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती केली जाणार आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी काल केला.

राज्य सरकारचे राज्यातील खासगी कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने परराज्यात नोकरभरतीचे मेळावे घेतले जात आहे. राज्यातील नोकऱ्या राजकारण्यांमार्फत परराज्यातील नागरिकांना विकल्या जात आहे. भाजप सरकारने राज्यातील युवा वर्गाच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी टीका मनोज परब यानी केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एमआरएफ कंपनीच्या कुडाळ येथील नोकरभरतीमध्ये त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने एमआरएफ कंपनीला गोमंतकीयांना 1250 रोजगार उपलब्ध करण्याच्या अटीवर कंपनीच्या प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिली आहे. पण, एमआरएफ कंपनी परराज्यात नोकर भरतीसाठी मेळावे आयोजित करून स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करीत आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने एमआरएफ कंपनीच्या कुडाळ येथील कथित रोजगार मेळाव्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कंपनीला तातडीने कथित रोजगार मेळाव्याबाबत स्पष्टीकरण करावे लागले आहे. एमआरएफ कंपनीने कुडाळ येथे रोजगार भरती मेळावा आयोजित केलेला नाही. तर, फर्मागुडी येथे आज 12 सप्टेंबरला रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी राज्यातील औषध निर्मिती कंपनीच्या परराज्यातील नोकर भरतीवरून वाद निर्माण झाला होता.