एफसी गोवाची आज चेन्नईनशी लढत

0
114

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा आणि चेन्नईन एफसी यांच्यात गुरुवारी लढत होत आहे. बाद फेरीची शर्यत रंगतदार बनल्यामुळे ही लढत चुरशीची होईल.

गोव्याने चेंडूवर ताबा ठेवत आक्रमक खेळाचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांची संभाव्य विजेते अशी गणना झाली. पण गेल्या तीन सामन्यांत त्यांना कमाल नऊ पैकी एकच गुण मिळविता आला. त्यामुळे सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाची स्थिती काहीशी अडचणीची झाली आहे. सध्या गोवा नवव्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावरील चेन्नईविरुद्ध त्यांना विजयाची नितांत गरज आहे.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर गोव्याला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळण्याची आशा आहे. हा सामना जॉन ग्रेगरी यांच्या चेन्नई संघासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. चेन्नई संघ गोव्यापेक्षा चार गुणांनी पुढे आहे, पण गोव्याचा एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे ही लढत जिंकल्यास गोव्याची संधी भक्कम होईल. तसे झाल्यास चेन्नईवरील दडपण वाढेल.

ही लढत खास महत्त्वाची असल्याचे दोन्ही प्रशिक्षकांनी सांगितले. दोन्ही संघांमध्ये पूर्वीच्या लढती चुरशीच्या झाल्या आहेत. याच मैदानावर चेन्नईने २०१५च्या मोसमात नाट्यमय अंतिम सामन्यात गोव्याला ३-२ असे हरवून विजेतेपद मिळविले होते. गेल्या मोसमात दोन्ही संघांमधील लढतीत नऊ गोलांचा थरार झाला होता. यात गोव्याची सरशी झाली होती.
लॉबेरा हे तीन गुणांसाठी आतूर आहेत, तर ग्रेगरी यांना एक गुण मिळाला तरी तो हवा आहे.

चेन्नईला मागील सामन्यात तळातील दिल्ली डायनामोजने १-१ असे बरोबरीत रोखले, पण यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे ग्रेगरी यांनी स्पष्ट केले.
उभय संघांमध्ये मोसमाच्या प्रारंभी झालेल्या लढतीत गोव्याने ३-२ असा विजय मिळविला होता. त्यामुळे घरच्या मैदानावरील पराभवाची परतफेड करण्याचा चेन्नईचा निर्धार असेल.