एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष; सूचनांसाठी 15 दिवस मुदतवाढ

0
29

यंदा शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यांपासून सुरू करण्याचा जो निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे, त्या निर्णयाला आक्षेप व सूचना सादर करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती काल शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.
यंदा एप्रिल महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा जो निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे. त्या निर्णयाला सध्या पालक, शिक्षक तसेच इतरांकडून विरोध होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल शिक्षण खात्याने वरील निर्णय घेतला.

एप्रिल हा उन्हाळ्याचा महिना असून, तापमानात वाढ होत आहे. तसेच अधूनमधून उष्णतेची लाट येत असते. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे उन्हातून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता असल्याने बऱ्याच पालकांनी या निर्णयाला विरोध दर्शविलेला आहे. एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू केल्यास मुलांना उन्हाळी शिबिरांनाही जाता येणार नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना आपल्या सूचना व आक्षेप नोंदवण्यात आणखी पंधरा दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.