>> हणजूणमध्ये कारवाई, 25.17 लाखांचे अमली पदार्थ जप्त
>> कारवाईत पश्चिम बंगालमधील संशयितास अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने हणजूण येथे छापा घालून सायकेडेलिक ड्रग एलएसडी बनवणाऱ्या एका प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य उत्पादक संशयित ए. कुंडू (पश्चिम बंगाल) अटक करून सुमारे 25.17 लाख रुपयांचे प्रतिबंधित अमलीपदार्थ जप्त केले आहे.
संशयित कुंडू हा देशातील काही राज्यात अमली पदार्थांची तस्करी करीत होता, असा पोलिसांचा दावा आहे. संशयित ड्रग्स उत्पादक ए. कुंडू हा एनसीबीने गेल्या आठवड्यात अमलीपदार्थ प्रकरणी अटक केलेल्या विदेशातील 1980 ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जलतरणपटू एस. वर्गानोव्हा आणि माजी रशियन पोलीस आंद्रे यांच्या संपर्कात होता. एनसीबीने ‘त्या’ दोघांना अटक करून आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल उघडकीस आणल्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीनुसार कुंडू याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबीच्या पथकाने सोमवारी उत्तर गोव्यातील हणजूण येथील उत्पादन युनिटवर छापा टाकला आणि त्या जागेवर एलएसडी तयार होत असल्याचे आढळून आले आहे. पथकाने 2,464 एलएसडी ब्लॉट्स (61.97 ग्रॅम), 10.47 ग्रॅम एमडीएमए पावडर, 76.6 ग्रॅम चरस ओलसर पावडर, 60.5 ग्रॅम गांजा, 3.42 ग्रॅम चरस आणि 25 सायलोसायबिन मशरूम कॅप्सूलसह प्रतिबंधक वस्तू जप्त केल्या आहेत.
याशिवाय रोख 32,000 रुपये, युएसडी 18 आणि श्रीलंकन रुपये 38,210 रोख देखील जप्त करण्यात आले आहेत. बेस मटेरियल आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेतील उपकरणांसह औषधांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
एनसीबीला विदेशी नागरिकांना अमलीपदार्थ प्रकरणाचा तपास करताना गोव्यातील घाऊक उत्पादकाची माहिती मिळाली. त्यानंतर हणजूण येथे एलएसडी तयार करणाऱ्या ए. कुंडूवर पाळत ठेवण्यात आली होती. प्रयोगशाळेतील उपकरणे, एलएसडी ब्लॉट्स तयार करण्यासाठी कच्च्या कागदाचा मोठा साठा, पेपर कटिंग मशीन, ड्रॉपर्स आणि अनेक न बुडवलेल्या स्क्वेअर-कट पेपर शीट्स छाप्यात सापडल्या आहे.
गोव्यातील एलएसडीची वाढती मागणी लक्षात घेऊन कुंडू याने औषध निर्मितीसाठी काळजीपूर्वक ज्ञान गोळा केले आणि नंतर हळूहळू प्रयोगशाळा सेटअप एकत्र केले. तो परदेशी नागरिकांसह ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या शहरातील इतर सिंडिकेटच्या संपर्कात होता, असेही सूत्रांनी सांगितले.