एनजीपीडीएच्या जागेतील अतिक्रमणास टाळे ठोका

0
31

मळा-पणजी येथील तळ्याजवळील उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) जमिनीवर उभारण्यात आलेल्या बांधकामाला चार दिवसांत टाळे ठोकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. एनजीपीडीएच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल गोवा खंडपीठाने एनजीपीडीएला फटकारले आहे. एनजीपीडीएच्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने एनजीपीडीएला दिले आहेत. तसेच, न्यायालयाने तिसवाडी मामलेदारांना येत्या 4 दिवसांत 2 बेकायदा बांधकामे सील करून 6 मे रोजी अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे. या प्रकरणी सुनावणी येत्या 8 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मळा पणजी येथील एनजीपीडीएच्या कार्यालयासमोरील जागा मळा तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी घेण्यात आली आहे. एनजीपीडीएच्या जमिनीवर कशा पद्धतीने अतिक्रमण केले आहे हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.